
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्याची बातमी व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आपल्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत फडणवीसांना राजीनामा देण्याची मागणी करताना दिसतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2019 मधील असून त्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत होते.
काय आहे दावा?
एका वेबपोर्टलच्या बातमीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला आहे की, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचा बहुमतावरून राजीनाम मागितल्याची कोणतीही अलिकडची बातमी मिळाली नाही. त्यांनी जर खरंच राजीनामा मागितला असता तर ही मोठी ठरली असती. त्यामुळे या व्हिडिओबाबात शंका निर्माण होते.
व्हिडिओमध्ये “आपला रिपोर्टर न्यूज नेटवर्क” सोबतच टीव्ही-9 चा वॉटरमार्क दिसतो.
त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, मूळ व्हिडिओ टीव्ही-9 मराठी वाहिनीचा आहे. टीव्ही-9 मराठीच्या युट्युब चॅनेलवर 26 नोव्हेंबर 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.
“फडणवीस ठरले तीन दिवसांचे मुख्यमंत्री”
2019 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेस विलंब होत होता. भाजपा आणि शिवसेनेचीही युती तुटली होती. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी पहाटेच शपधविधी करून सर्वांना धक्का दिला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने पारदर्शक पद्धतीने बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देताच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आघाडी फिस्कटली.
राष्ट्रवादी, शिवेसेना आणि कांग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमताचा दावा केला होता. 26 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालिन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची मागणी केली होती.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जून 2022 मध्ये बंड करून भाजपसी हाथ मिळवत सत्ता स्थापन केली.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा राजीनामा मागितल्याची बातमी 2019 मधील आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला का? जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
