
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले. संपूर्ण देश जेव्हा या सैनिकांच्या बलिदानाला नमन करीत होता, तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडियो पसरविला जाऊ लागला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हुतात्मा जवानाच्या पार्थिवापाशी बसून हसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग याची पडताळणी केली.
फेसबुकवर एका या यूजरने 20 फेब्रुवारी रोजी संबंधित व्हिडियो पोस्ट केला होता. सोबत कॅप्शन लिहिले होते की, “पुलवामा हल्ल्यातील शहिदाच्या अंतिम संस्कारवेळी UP चे CM योगी आदित्य नाथ… घटनेचे गांभीर्य नसणे आणि पदासाठी लायक नसणे म्हणजे काय हे लक्षात येते.”
या व्यतिरिक्त अनेक यूजर्सनेदेखील हा व्हिडियो पोस्ट केलेला आहे. या व्हिडियोवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला शहिदांचा अपमान म्हटले आहे तर, काहींनी “या प्रसंगावरून राजकारणी लोकांची देश व जवानांविषयीची खरी भावना दिसून येत,” असल्याचे म्हटले आहे.

तथ्य पडताळणी
फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी करण्यासाठी गुगलवर Yogi Adityanath laughing असे सर्च केले. त्यावरून यूट्यूबवरील खालील व्हिडियो मिळाला.
हा व्हिडियो द टाईम्स ऑफ इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून 22 ऑक्टोबर 2018 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडियोच्या शीर्षकानुसार हा व्हिडियो, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा आहे. यामध्ये मुख्यनंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्री हसत-हसत गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत. त्यावेळी या व्हिडियोवरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
यासंबंधीच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता – दैनिक भास्कर । क्विंट हिंदी

दैनिक भास्कर अर्काइव्ह । क्विंट हिंदी अर्काइव्ह
संबंधित 17 सेंकदाची व्हिडियो क्लिप या मूळ 41 सेंकदाच्या क्लिपमधून एडिट केल्याचे स्पष्ट होते.
निष्कर्ष
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते, हा व्हिडियो जूना असून एन. डी. तिवारी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानाच्या पार्थिवापाशी बसून हसल्याचा दावा असत्य आहे.

Title:खरंच योगी आदित्यनाथ शहिदाच्या पार्थिवापाशी बसून हसत होते का? वाचा सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
