
दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांनी संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची स्थापना केल्यामुळे बराच वाद झाला. त्यानंतर तरडे यांनी जाहीर माफी मागतली व गणपतीच्या मूर्तीखालून संविधानाची प्रत काढली. आता सोशल मीडिया एका मराठी वाहिन्याच्या बातमीचा व्हिडियो पसरविला जातोय की, प्रवीण तरडे यांना त्यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली.
फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा दोन वर्षांपूर्वीच्या बातमीचा व्हिडियो आहे. तरडे यांना अलिकडे मारहाण झालेली नाही.
काय आहे दावा?
एबीपी माझा वाहिनीच्या बातमीची 19 सेकेंदाची क्लिप फिरवली जात आहे. यामध्ये म्हटले की, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या पौड रोडवरील कार्यालयात घुसून काही अज्ञातांनी त्यांना मारहाण केली.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
प्रवीण तरडे यांना खरोखरंच मारहाण झाली का याचा शोध घेतला असता कळाले की, व्हायरल व्हिडियोतील बातमी 2018 साली घडलेल्या घटनेची आहे. ‘लोकसत्ता’च्या 18 नोव्हेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, प्रवीण तरडे यांच्या पौड येथील कार्यालयामध्ये काही अज्ञातांनी प्रवेश करत कार्यालयाची तोडफोड करुन प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की केली होती.
त्यावेळी प्रवीण तरडे यांनी सांगितले होते की, ‘मी पौडमधील माझ्या कार्यालयामध्ये असताना आमच्या मुळशी गावातील काही अज्ञात मुलांनी माझ्या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड केली. मात्र मला कोणतीही मारहाण करण्यात आली नसून केवळ धक्काबुक्की झाली आहे. पण मी ठीक आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता
या घटनेची बातमी ‘एबीपी माझा’ वाहिनेनेसुद्धा त्यावेळी दिली होती. ती बातमी तुम्ही खाली पाहू शकता. 18 नोव्हेंबर 2018 रोजी हा व्हिडियो युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. याच बातमीची अर्धवट क्लिप संदर्भाविना सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातील काही संवादांवर आक्षेप घेत काही तरुणांनी थेट तरडे यांच्याशीच वाद घातला होता. 2018 साली कार्यालयात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणासंदर्भात तरडे यांनी कोथ्रुड पोलिस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविला होता.
मग प्रवीण तरडे यांनी अलिकडे मारहाण झाली का?
कार्यालयात घुसून मारहाण झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर तरडे यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह करीत ही खोटी बातमी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मला मारहाण झालेली नाही. तशा खोट्या अफवा पसरवून दोन समाजांमद्ये तेढ निर्माण करण्याचा कोणी तरी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. कृपया कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नका.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, प्रवीण तरडे यांना मारहाण झाल्याची दोन वर्षांपूर्वीची बातमी पुन्हा नव्याने खोडसाळ पद्धतीने पसरविली जात आहे. तरडे यांना मारहाण झाल्याची बातमी 2018 मधील असून, तरडे यांना अलिकडे मारहाण झालेली नाही. अफवांवर विश्वास न ठेवण्याची आवाहन करण्यात येत आहे.

Title:प्रवीण तरडे यांना मारहाण झाली नाही; तो व्हिडियो 2018 मधील बातमीचा, वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
