मीरारोड स्टेशनला आग लावण्यात आली नाही; व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधील

False सामाजिक

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यच्या पूर्वसंध्येला (21 जानेवारी) मुंबईतील मीरारोड भागात समाजकंटकांनी श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक केल्यामुळे हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक जुने व असंबंधित व्हिडिओ शेअर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. 

अशाच एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, मुंबईमध्ये मीरारोड रेल्वे स्थानक पेटवून देण्यात आले. सोबत एका रेल्वे स्थानकाध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ मुंबईतील नसून पश्चिम बंगालमधील आहे. 

काय आहे दावा?

12 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एका रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर भीषण आग लागेलेली दिसते. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मीरारोड रेल्वेस्थानकाचा असून दंगेखोरांनी तेथे आग लावली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर मीरारोड स्थानकावर आग लागल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. इतकी मोठी घटना घडली असती तर तीची नक्कीच मोठी बातमी झाली होती. परंतु, तसे काही दिसून आले नाही. 

त्यानंतर व्हायरल व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील संतोषपूर रेल्वेस्थानकाचा आहे. तेथे 6 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी प्लॅटफॉर्मवर भीषण आग लागली होती. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, 6 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाचता गर्दीच्या वेळीच ही आग लागली होती. यात अनेक दुकानांचे नुकसान झाले; परंतु, जीवितहानी झाली नव्हती.

फॅक्ट क्रेसेंडोने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता कळाले की, मीरारोड स्थानकावर आगीची कुठलीही घटना घडली नाही. 

मीरारोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सोशल मीडियावर अफवांचे खंडन करीत सांगितले की, मीरारोड स्थानक सुरक्षित असून, तो व्हिडिओ तेथील नाही. 

नया नगर ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक विलास सुपे यांनीसुद्धा मीरारोड स्थानक पेटविल्याची अफवा असल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, जुना आणि असंबंधित व्हिडिओ शेअर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. मीरारोड रेल्वेस्थानक पेटविण्यात आलेले नाही. तो व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधील आहे. मीरा रोड भागात परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मीरारोड स्टेशनला आग लावण्यात आली नाही; व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधील

Written By: Agastya Deokar 

Result: False