सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन नेते एकमेकांशी भांडताना दिसतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये अशी मारहाण झाली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भांडण करणारे नेते काँग्रेसचे नव्हते. चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ भाजप नेत्यांमधील वादाचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन नेते एकमेकांना मारहाण करत अपशब्द वापरत आहेत.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “काँग्रेस पक्षाने मध्य प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर प्रेम आणि आपुलकीचे जबरदस्त दृश्य पाहायला मिळाले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा आहे.

जनसत्ताने 6 मार्च 2019 रोजी या घटनेविषयी एक बातमी प्रसारित केली होती.

खालील बातमीच्या स्क्रीनशॉटमध्ये आपण व्हायरल व्हिडिओतील काही दृश्य पाहू शकता.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका दगडी स्लॅबवर नाव लिहिण्यावरून भाजप आमदार आणि खासदार यांच्यात जोरदार मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.”

सदरील बातमी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदवळचे आमदार राकेशसिंग बघेल यांच्यात आधी बाचाबाची झाली. यानंतर खासदार बुट काढून आमदाराच्या दिशेने भिरकावला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली.

एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकांउटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. “संत कबीर नगर: एका प्रकल्पाच्या पायाभरणीला नावे ठेवण्यावरुन वाद सुरू झाल्यानंतर भाजप खासदार शरद त्रिपाठी आणि भाजप आमदार राकेश सिंह यांच्यात हाणामारी झाली.”

https://twitter.com/ANINewsUP/status/1103271105643581440

भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते शरद त्रिपाठी यांनी या संपूर्ण घटनेबाबत आपली बाजू मांडली की, “मी या घटनेला एक दुर्घटना मानतो. या आधी माझ्या हातून असे कधीच केले नव्हते, आत्मरक्षणासाठी मला असे पाऊल उचलावे लागले होते.”

https://youtu.be/vHF0A7Yq2B8?si=RAoHlXeRujMXdSl9

जिल्हाधिकारी नजीर सय्यद नफिसुल हसन यांनी दोन्ही नेत्यांसह काही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचा अंतिम अहवाल स्वीकारत न्यायालयाने दोन्ही नेत्यांना दिलासा देत प्रकरण संपवले.

दरम्यान, खासदार शरद त्रिपाठी यांचा 30 जून 2021 रोजी मृत्यू झाला. सविस्तर बातमी आपण येथे पाहू शकतात.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक

भारतीय निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.

मध्यप्रदेश 17 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून या सर्वच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.

काँग्रेसने मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह एकूण 69 विद्यमान आमदारांची नावे आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे नेते तथा विद्यमान मुख्यमत्री शिवाजसिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेता असलेले आणि हनुमानाची भूमिका साकारलेले विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे. संपूर्ण बातमी येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशचा नसून उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरचा आहे. 2019 मध्ये एका बैठकीत दिवंगत भाजप खासदार शरद त्रिपाठी यांचा त्यांच्याच पक्षातील आमदार राकेश सिंह बघेल यांच्याशी वाद झाला होता. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भाजप नेत्यांमधील मारहाणीचा जुना व्हिडिओ काँग्रेस नेत्यांच्या नावाने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False