
दोन आठवड्यानंतरही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन सुरू आहे. वसितगृहासह इतर शुल्कवाढीचा विरोध करण्यासाठी सुरू झालेले आंदोलन सोशल मीडियावरही खूप गाजत आहे. दिल्ली पोलिसांनी प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करीत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सोशल मीडियावर दावा केला जातो की, जेएनयूमध्ये तरुणांसोबतच वयोवृद्धसुद्धा विद्यार्थी म्हणून राहतात. त्याचेच एक उदाहरण म्हणून एका ज्येष्ठ महिलेचा फोटो शेयर केला जात आहे. दिल्ली पोलिस या महिलेला पकडत असल्याचे या फोटोत दिसते. युजर्स म्हणत आहेत की, या जेएनयूमधील विद्यार्थिनी आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. रिझल्टनुसार हा फोटो जेएनयूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा नाही हे स्पष्ट होते. एनडीटीव्हीच्या 7 मे 2019 रोजीच्या बातमीनुसार, हा फोटो मे महिन्यातील आहे. लैंगिक गैरवर्तनप्रकरणी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लिन चीट देण्यात आली होती. याविरोधात महिला वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर प्रदर्शन केले होते. तेव्हा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली होती. हा फोटो त्यावेळीचा आहे.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही
याविषयी अधिक शोध घेतल्यावर मातृभूमी या मल्याळम भाषेतील वेबसाईटवर या फोटोतील महिला सीपीआयच्या वरीष्ठ नेत्या अॅनी राजा असल्याचे म्हटले आहे.
अॅनी राजा नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन (NFIW) या संघटनेच्या सरचिटणीस आहेत. त्या सीपीआय पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार डी. राजा यांच्या पत्नी आहेत. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने डी. राजा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, “व्हायरल फोटोमध्ये त्यांची पत्नी अॅनी राजा आहेत. हा फोटो गेल्या मे महिन्यातील असून, सध्याच्या जेएनयू आंदोलनाशी या फोटोचा काहीही संबंध नाही.”

निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, एका ज्येष्ठ महिलेला पोलिस व्हॅनमध्ये बसवत असतानाचा फोटो जेएनयू आंदोलनातील नाही. फोटोत दिसणारी महिला जेएनयूची विद्यार्थिनी नसून, त्या सीपीआयच्या वरीष्ठ नेत्या अॅनी राजा आहेत. मे 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाबाहेर प्रदर्शनाच्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.

Title:सीपीआय नेत्याचा जूना फोटो जेएनयू आंदोलनातील विद्यार्थिनी म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
