
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर भाजप नेते दिसतात. दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रपतीसुद्धा उपस्थित होत्या.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो दोन वर्षांपूर्वीचा असून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत होत्या त्यावेळीचा हा फोटो आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज देत असताना त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते दिसतात.
युजर्स फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “उमेदवाराचा फॉर्म भरायला राष्ट्रपती जावू शकतात का?”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर वरून हा फोटो 24 जून 2022 रोजी शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले की, “द्रौपदी मुर्मू जी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांचे नेते.”
https://twitter.com/narendramodi/status/1540367064111538176
सदरील माहितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, द्रौपदी मुर्मू यांनी 24 जून 2022 रोजी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर प्रथमच दिल्लीत पोहोचलेल्या मुर्मू यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांची भेट घेतली होती. अधिक माहिती येथे वाचू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामांकन
इंडिया टूडेच्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मे रोजी यूपीच्या वाराणसीमध्ये मेगा रोड-शो करणार आणि दुसऱ्या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. वाराणसीमध्ये काँग्रेसचे अजय राय यांच्याशी पंतप्रधान मोदींचा सामना होणार आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा नाही. 2022 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांनी नामांकन भरतानाचा हा फोटो आहे. नरेंद्र मोदींना अद्याप लोकसभा निवडणूकीचा अर्ज दाखल केलेला नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गेल्या होत्या का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
