पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

पाठीवर जबर मारहाणीचे व्रण असणाऱ्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेला हा शेतकरी आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, हे फोटो जुने असून त्यांचा शेतकरी आंदोलनाशी काही संबंध नाही.

काय आहे दावा?

एका जखमी शीख व्यक्तीचा फोटो शेअर करून म्हटले की, “मोदी शेठ तुम्ही शेतकऱ्यांवर चालवलेल्या प्रत्येक लाठीचा हिशेब होणार एवढं लक्षात ठेवा. म्हाताऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले करताय. #किसानआंदोलन”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा फोटो खरंच शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याचा आहे का हे शोधण्यासाठी फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो 16 जून 2019 रोजी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका टेम्पो चालकाचा आहे. 

‘पंजाब केसरी’च्या वृत्तानुसार, या टेम्पो चालकाचे नाव सरबजीत सिंह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना लाच मागितली होती. त्यांनी देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी सरबजीतसोबत त्यांचा अल्पवयीन मुलगादेखील होता. दिल्लीतील मुखर्जीनगर येथील मुख्य रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने या घटनेचा व्हिडियो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.

मूळ बातमी येथे वाचा – पंजाब केसरीअर्काइव्ह

व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडियोसंबंधी त्यांची बाजू मांडली की, सरबजीत सिंह यांच्या टेम्पोने पोलिसांच्या गाडीला धडक दिली होती. त्यानंतर वाद घालत त्यांनी आधी पोलिसांवर कृपाणद्वारे हल्ला केला. बचाव करण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली.  

या प्रकरणी पोलिस आणि सरबजीत सिंह दोघांनी एकमेकांविरोधात एफआयआर दाखल केली होती. जखमी पोलिस कॉन्स्टेबल मुकेश यांच्या तक्रारीवरून सरबजीत व त्यांच्या मुलावर कलम 186, 353 आणि 332/34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

एखाद्या व्यक्तीला असे भररस्त्यात मारण्यावरून दिल्ली पोलिसांवर प्रचंड टीका झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा निःपक्ष तपास करून दोषी पोलिसांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली होती. 

शीख समुदायातूनदेखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजकीय वातावरण तापल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन पोलिसांना निलंबित केले होते. ‘इंडिया टुडे’ वाहिनीला सरबजीत सिंह यांनी या सर्व घटनेचा तपशील सांगितला होता.

दिल्ली सीमावर्ती भागामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी विविध दाव्याचे फॅक्ट क्रेसेंडोने सत्य समोर आणलेले आहे. ते तुम्ही येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, 2019 साली झालेल्या एका घटनेत जखमी व्यक्तीचे फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडून पसरविले जात आहेत. व्हायरल फोटोतील व्यक्ती शेतकरी आंदोलनात जखमी झालेला शेतकरी नाही.

Avatar

Title:आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी शेतकऱ्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False