
भारतीय रेल्वे आणि विमानतळांचे खासगीकरण हा वादग्रस्त मुद्दा आहे. अशाच खासगीकरणाच्या एका निर्णयावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमधील अहमदाबादच्या सरदार वल्लाभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून अडाणी समूहाचे नाव देण्यात आले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला.
काय आहे दावा?
“अडाणी एअरपोर्ट्स – वेलकम टू अहमदाबाद” अशा एका बॅनरचा फोटो शेअर करून म्हटले की, “पहा हे नरेंद्र मोदीच अदानी प्रेम! या फडतुसान अदानी अंबानी यांना देश तर विकायला काढलाच! पण हा मोदी ज्या वल्लभभाई पटेल चा जयजयकार करून, काँग्रेसवर टिका करत होता, त्या अहमदाबाद एयरपोर्ट च नाव आता — सरदार वल्लभभाई पटेलच अदानी एयरपोर्ट केल..! हा खालील बोर्ड पहा!”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
की-वर्ड्सद्वारे सर्च केल्यावर कळाले की, गुजरातमधील काही काँग्रेस नेत्यांनी आरोप केला होता की, अहमदबादच्या विमानतळाच्या नावातून सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव काढून ते अडाणी समूहाच्या नावे केले. त्यांनी अहमदाबाद शहरातील अशा बॅनरचा हवाला देत आक्षेप घेतला होता.
परंतु, सत्य परिस्थिती जरा वेगळी आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, गुवाहटी, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू येथील विमानतळांचे अडाणी समूहाकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरण केले आहे. त्याअंतर्गत अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अडाणी समूहाच्या Adani Airports या उपकंपनी कडे 7 नोव्हेंबर रोजी सोपविण्यात आले.
अडाणी ग्रुपने विमानतळाचे नाव बदलले का?
नाही. अहमदाबाद विमानतळाला आजही सरदार वल्लभभाई पटेल यांचेच नाव कायम आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वेबसाईटवर या विमानतळाचे अधिकृत नाव सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच आहे.
मग त्या बॅनरचे काय?
अहमदाबाद शहरामध्ये अडाणी समूहातर्फे विविध ठिकाणी असे बॅनर लावण्यात आले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये बॅनरची केवळ एकच बाजू दिसते. या बॅनरच्या दुसऱ्या बाजूने ‘वेलकम टू सरदार वल्लाभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट’ असे लिहिलेले आहे.
मूळ स्रोत – टाईम्स ऑफ इंडिया
बॅनरवर Adani Airports असे का लिहिलेले आहे?
अडाणी समूहाचे विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्यात वीज, रस्तेनिर्मिती, खाद्यतेल, सौरऊर्जा अशा वेगवेगळ्या उद्योगांचा समावेश आहे. विमानतळांचे कंत्राट मिळवण्याचे काम त्यांच्या ‘अडाणी एअरपोर्ट’ या उपकंपनीतर्फे करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या जाहिरातीमध्ये Adani Airports अशी ब्रँडिंग केली जाते. त्याचा अर्थ विमानतळाचे नाव बदलले असा होत नाही.
लखनऊ विमानतळाचेही काम अडाणी समूहाकडे आहे. तेथेसुद्धा बॅनरवर चौधर चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा नावासह Adani Airports चा लोगो आहे.
मूळ स्रोत – एबीपी गंगा
सोशल मीडियावर अहमदाबाद विमानतळासंबंधी दावे व्हायरल होऊ लागल्यानंतर गुजरातमधील पत्र व सूचना कार्यलयाने खुलास केला की, विमानतळाचे नाव बदलण्यात आलेले नाही.
“सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. फोटोमधील बॅनरच्या दुसऱ्या बाजूने सरदार वल्लाभभाई पटेल आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असे लिहिलेले आहे,” असे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, अहमदाबाद विमानतळाचे नाव बदलून अडाणी विमानतळ करण्यात आलेले नाही. अहमदाबाद विमानतळाला आजही सरदार वल्लभभाई पटेल यांचेच नाव कायम आहे.

Title:‘सरदार वल्लभभाई पटेल’ विमानतळाला आता अडाणी समूहाचे नाव देण्यात आले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
