FACT CHECK: मलेशिया सरकारने झाकीर नाईकला पकडून भारताच्या स्वाधीन केले आहे का?

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याला आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर या प्रयत्नांना यश आल्याचे दिसते. फेसबुक पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, मलेशिया सरकारने झाकीर नाईकला अटक केली असून, त्याला भारताकडे सोपविले आहे. मोदी सरकारची हो मोठी कामगीरी असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत एबीपी न्यूज चॅनेलने ही बातमी दिल्याचेही दर्शविले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये एबीपी न्यूजच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून लिहिलेले आहे की, प्रक्षोभक भाषणांद्वारे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या झाकीर नाईकला मलेशिया सरकार आज भारतात वापस पाठवणार आहे. मलेशियाने नाईकला पकडले असून, भारताच्या स्वाधीन केले आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम एबीपी न्यूजने अशी काही बातमी दिली का याचा शोध घेतला. एबीपी न्यूजच्या वेबसाईटवर अशी कोणतीही न्यूज सापडली नाही. तसेच इतर कोणत्याही मीडिया वेबसाईट्सवर यासंदर्भात बातमी आढळली नाही. झाकीर नाईक सारख्या वादग्रस्त व्यक्तीला पकडून भारताकडे सोपविले असते तर, ही फार मोठी बातमी झाली असती. तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पोस्टमधील दाव्याविषयी शंका घेण्यास वाव आहे.

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे 1 जुलै 2016 रोजी कॅफेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी झाकीर नाईकचे भाषणं ऐकून प्रेरित झाला होता, असे समोर आले होते. तेव्हापासून झाकीर नाईक प्रामुख्याने तपास यंत्रणाच्या रडारवर आला होता. त्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणने (एनआयए) नाईक आणि त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) विरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच आयआरएफ संस्थेवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – द स्टारअर्काइव्ह

सरकारी यंत्रणा मागे लागल्यानंतर झाकीर नाईक मलेशियामध्ये स्थायिक झाला. मलेशियाच्या उपपंतप्रधानांनी 2017 साली अधिकृतरीत्या मान्य केले की, मलेशिया सरकारने झाकीर नाईकला कायमस्वरुपी निवासीचा दर्जा दिलेला आहे. त्यांनी सांगितले होते की, ‘मलेशिया सरकारने नाईकला नागरिकत्व दिलेले नाही. केवळ वास्तव्याची परवानगी दिली आहे.’ झाकीर नाईक सध्या तेथेच राहतो. 

मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी 10 जून रोजी द स्टार वेबसाईटला सांगितले होते की, झाकीर नाईकला भारताकडे न सोपविण्याचा अधिकार मलेशिया सरकारकडे आहे. यामागचे कारण त्यांनी सांगितले की, झाकीरला भारतात योग्य आणि न्यायपूर्णपणे आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही, अशी त्याला भीती वाटते. ही गोष्ट लक्षात घेता त्याला भारताकडे स्वाधीन न करण्याचा अधिकार आम्हाला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्सअर्काइव्ह

मलेशियाच्या पंतप्रधानांनी झाकीरला न सोपविण्यासंदर्भात प्रतिपादन केल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर भारताने मलेशिया सरकारकडे झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची विनंतीदेखील केली. मलेशियाचे परराष्ट्र मंत्री सैफुद्दीन अब्दुल्लाह यांनी 28 जून रोजी माहिती दिली होती की, भारताने मलेशियाकडे झाकीरला स्वाधीन करण्याची मागणी केली आहे. परंतु, मलेशिया सरकारन नाईकला परत न पाठविण्याच्या निर्णायावर ठाम आहे.

मूळ बातमी येथे वाचा – फ्री मलेशिया टाईम्सअर्काइव्ह

विशेष म्हणजे झाकीर नाईक मलेशियामध्ये मुक्तपणे फिरत असून, पुढील महिन्यात 7 ते 10 ऑगस्टदरम्यान तो केलंटन व्याख्यानमालेसाठी दौऱ्यावर जात आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात यावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. याप्रकरणी सुनवाणी करताना 19 जून रोजी मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने झाकीरला दणका देत 31 जुलैपूर्वी कोर्टात प्रत्यक्ष हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

निष्कर्ष

झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये कायम निवासी म्हणून राहत असून, त्याला अटक करण्यात आलेली नाही. तेथील सरकारने त्याला भारताच्या स्वाधीन न करण्याचा सध्या निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे झाकीरला भारताकडे सोपविण्याची पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: मलेशिया सरकारने झाकीर नाईकला पकडून भारताच्या स्वाधीन केले आहे का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False