FAKE ALERT: मोतीलाल वोरा यांनी राहुल गांधी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला नाही

False राजकीय | Political

राहुल गांधी यांनी लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांमध्ये मोतीलाल वोरा यांचे नाव आघाडीवर आहे. अनेकांनी तर त्यांची निवड झाल्याचे जाहीरही केले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, निवड झाल्यानंतर मोतीलाल वोरा यांनी राहुल गांधी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती राहुल गांधी यांच्या समोर वाकलेला दिसतो. बघता क्षणी असे वाटते की, तो व्यक्ती राहुल गांधी यांच्या पाया पडत आहे. सोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा दिसत आहेत. युजरने फोटोला कॅप्शन दिले की, कॉग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ९१ वर्षाचा #मोतीलाला_वोहरा कॉग्रेस च्या मालकाचा आशिर्वाद घेताना. #संस्कार

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर विविध बातम्या समोर आल्या. इंडिया टुडेच्या 20 डिसेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, राहुल गांधी यांचे कथितरीत्या पाया पडणाऱ्या व्यक्तीचे नाव टी. एस. सिंग देव आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे मंत्री आहेत. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत काँग्रेसने छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केली. 17 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथग्रहण समारंभात हा फोटो काढण्यात आला होता.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

विविध वेबसाईट्सनेदेखील हा फोटो टी. एस. सिंग देव यांचा असल्याचे म्हटले आहे. या फोटोवरून त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. पत्रिका वृत्तपत्रानेदेखील या हा फोटो छापला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, व्हायरल होत असेलेल्या फोटोमध्ये खाली वाकलेले व्यक्ती ज्येष्ठ नेते टी. एस. सिंग देव आहेत. नवे मुख्यमंत्री भूपेश बघेला यांच्या शपथग्रहण समारंभापूर्वीचा हा फोटो आहे.

मूळ बातमी येथे वाचा – पत्रिका

फेसबुकवरसुद्धा हा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. लल्लनटॉप आणि एबीपी न्यूजनेसुद्धा या फोटोबद्दल बातम्या केल्या आहेत. टी. एस. सिंग देव पाया पडण्यासाठी खाली वाकले होते की, दुसऱ्या काही कारणाने हे स्पष्ट होऊ शकले नाही. या समारंभाच्या व्हिडियोमध्ये सिंग देव स्टेजवर राहुल गांधीचे पाया पडण्यासाठी खाली वाकताना दिसतात. परंतु, राहुल त्यांना लगेच थांबवतात आणि हात हातात घेतात. 

मोतीलाल वोरा कोण आहेत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा  मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव समोर आले. परंतु, त्यांनी स्वतः या वृत्ताचे खंडन केले आहे. लोकसत्ताच्या बातमीनुसार, वोरा यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. आपल्याला या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे वोरा यांनी स्पष्ट केले.

अर्काइव्ह

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राहुल गांधी यांच्या पाया पडत असलेला ज्येष्ठ व्यक्ती मोतीलाल वोरा नाहीत. या फोटोत खाली वाकलेली व्यक्ती छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंग देव आहेत. गेल्यावर्षी छत्तीसगड मंत्रीमंडळाच्या शपथग्रहण समारोहातील हा फोटो आहे. तसेच मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष नाहीत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FAKE ALERT: मोतीलाल वोरा यांनी राहुल गांधी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False