गांधी जयंतीच्या जाहिरातीत गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरण्यात आला का?

False राजकीय | Political

दिल्ली सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या एका कथित जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या या जाहिरातीमध्ये महात्मा गांधींऐवजी केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरल्याचे दिसते.

या व्हायरल जाहिरतीवरून नेटकरी केजरीवाल यांच्यावर गांधींना डावलून ‘स्वतःची टिमकी वाजविली’ अशी टीका करून खिल्ली उठवित आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, जाहिरातीचा व्हायरल फोटो बनावट आहे.

काय आहे दावा?

गांधी जयंतीनिमित्त वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीत मध्यभागी केजरीवाल यांचा मोठा तर खाली कोपऱ्यात गांधीजींचा छोटा फोटो दिसतो. ही जाहिरात शेअर करून युजर्स म्हणत आहे की, “जयंती कोणाची आहे कळतं नाही. केजरीवालची का बापुची.”

दिल्ली सरकारने खरंच ही जाहिरीत प्रसिद्ध केली का, याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटोचे निरीक्षण केल्यावर कळते की, दैनिक जागरणमधील ही जाहिरात आहे. त्यानुसार, दैनिक जागरणचा 2 ऑक्टोबर 2021 रोजीचा अंक तपासला. दिल्ली एडिशनच्या पाचव्या पानावर दिल्ली सरकारच्या माहिती व प्रचार संचालनालयातर्फे गांधी जयंतीनिमित्त एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

परंतु, ही जाहिरात आणि व्हायरल होत असलेल्या फोटोतील जाहिरात पूर्णतः वेगळी आहे. खऱ्या जाहिरातीमध्ये महात्मा गांधी यांचाच मोठा फोटो वापरण्यात आलेला आहे.

दैनिक जागरण

यावरून लगेच कळते की, व्हायरल पोस्टमध्ये मूळ जाहिरातीला छेडछाड करून त्यात केजरीवाल यांचा मोठा फोटो वापरण्यात आला. मूळ जाहिरातीमध्ये केजरीवाल यांचा कोपऱ्यात लहान फोटो  आहे तर मध्यभागी गांधीजींचा मोठा फोटो आहे.

सोशल मीडियावर बनावट जाहिरात व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षातर्फे (दिल्ली विभाग) याविषयी खुलासा करण्यात आला आहे. व्हायरल दाव्याचे खंडन करीत त्यांनी सोबत मूळ जाहिरातीचा फोटो जोडला आहे. 

मूळ जाहिरात आणि व्हायरल फोटो यांची तुलना खाली पाहू शकता. यावरून दोन्हींमधील फरक लगेच दिसतो.

निष्कर्ष

दिल्ली सरकारतर्फे गांधी जयंतीनिमित प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये महात्मा गांधी यांनाच महत्त्व देत त्यांचा मोठा वापरण्यात आलेला आहे. केजरीवाल यांचा मोठा फोटो असणारी ती व्हायरल जाहिरात बनावट आणि फोटोशॉप केलेली आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गांधी जयंतीच्या जाहिरातीत गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरण्यात आला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False