मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये फक्त काही तासांमध्ये पक्षाघाताच्या रुग्णाला पूर्णपणे बरे करणारी मशीन आली, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. जगभरात काही निवडक ठिकाणीच अशी मशीन उपलब्ध असून, केईएम हॉस्पिटलमध्ये तिचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज जुना असून याबाबत नीट माहिती समजून घेणे गरजेचे आहे.

काय आहे मेसेजेमध्ये?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, “परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात रुग्ण २४ तासाच्या आत घेऊन जाणे या आजारावर ॲटोमॅटिक मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्वीसारखा बरा होतो, रुग्णाच्या मेंदूतील गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लास्टी प्रमाणे काढून टाकल्या जातात, भारतात प्रथम या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.जगभरात काही ठराविक ठिकाणीच अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे (न्युरोसर्जन) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. माहिती सर्वाना कळवा फायदा होईल. ग्रुपमध्ये असलेल्या सर्व मित्रांना विनंती आहे की ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी, ही विनंती धन्यवाद.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम केईएम हॉस्पिटलमध्ये अशी काही मशीन आहे का याची माहिती घेतली. 2018 साली या दवाखान्यात पक्षाघात, लकवा आदींच्या उपचारांसाठी ब्रेन स्ट्रोक युनिट स्थापन करण्यात आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या 11 ऑक्टोबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, पक्षाघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यासाठी केईएम हॉस्पिटलच्या ब्रेन स्ट्रोक युनिटमध्ये ‘बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन एँजिओग्राफी’ ही अत्याधुनिक मशीन खरेदी करण्यात आली होती. या विभागाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला मोठा झटका किंवा रक्ताची मोठी गाठ असल्यास ती विरघळणे अवघड असते. त्यामुळे या अत्याधुनिक मशीनद्वारे उशिरा येणाऱ्या रुग्णांच्याबाबतीत चोवीस तासांपर्यंत एँजिओग्राफीमार्फत रक्ताची मोठी गुठळी काढता येणे शक्य होणार आहे, असे महानगरच्या बातमीत म्हटले आहे.

या मशीनचा उपयोग काय?

पक्षाघाताचा झटका आल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत (गोल्डन अवर) रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले तर त्या रुग्णाचा जीव वाचवणे अधिक सोपे असते. परंतु, दरवेळी असे करणे शक्य नसते. म्हणून गोल्डन अवरनंतर आलेल्या रुग्णांवरही उपचार करण्यासाठी ‘बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन एँजिओग्राफी’ या मशीनचा उपयोग होतो.

परंतु, या या मशीनमुळे सगळ्याच पक्षाघाताच्या रुग्णांना बरे करता येत नाही.

केईएम रुग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांच्यानुसार, पक्षाघाताचा झटका आल्यानंतर 24 तासांच्या आत या मशीनद्वारे उपचार शक्य होतो. जुन्या रुग्णांवर याद्वारे उपचार केला जात नाही.

म्हणजे फक्त गोल्डन अवर (या ठिकाणी 24 तास) काळातच येणाऱ्या रुग्णांसाठी ही मशीन वरदान ठरू शकते.

भ्रामक मेसजमुळे गोंधळ

या मशीनच्या उद्घाटनापासून सदरील मेसेज व्हायरल होत आहे. 2018 मध्ये जेव्हा प्रथम हा मेसेज व्हायरल झाला तेव्हा मोठ्या संख्येने रुग्णांनी केईएम हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

डॉ. डांगे यांनी मुंबई मिररला त्यावेळी सांगितले होते की, “या मेसेजमुळे गोंधळ उडाला. अनेकांना वाटले की, पक्षाघाताच्या सगळ्याच रुग्णांवर या मशीनद्वारे उपचार होतो. परंतु, असे नाही. पक्षाघाताच्या झटका आल्यानंतर फक्त पहिल्या 24 तासांच्या आतच मशीनद्वारे उपचार करून रुग्ण बरा केला जाऊ शकतो. त्यापेक्षा अधिक काळापासून त्रस्त असलेल्या रुग्णांना फक्त काही तासांत बरे केले जात नाही.”

निष्कर्ष

केईएम हॉस्पिटलमध्ये पक्षाघाताच्या रुग्णांना पूर्ण बरे करणारी मशीन आल्याचा हा मेसेज जुना आणि गोंधळात टाकणारा आहे. केईएम रुग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी स्पष्ट केलेले आहे की, पक्षाघाताच्या झटका आल्यानंतर फक्त पहिल्या 24 तासांच्या आतच मशीनद्वारे उपचार करून रुग्ण बरा केला जाऊ शकतो. त्यापेक्षा अधिक काळापासून त्रस्त असलेल्या रुग्णांना फक्त काही तासांत बरे केले जात नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:केईएम हॉस्पिटलमध्ये काही तासांत पक्षाघाताच्या रुग्णाला बरे करणारी मशीन? जुना मेसेज पुन्हा व्हायरल

Fact Check By: Aagstya Deokar

Result: Misleading