
मुंबईहून परप्रांतीय, उत्तर भारतीयांसाठी खास रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. पण मुजोर भय्ये लोकांनी त्यांची लायकी दाखवून दिली. शाकाहारी जेवण, पाण्याच्या बाटल्या प्लॅटफॉर्मवर फेकुन दिले, अशा माहितीसह समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील अथवा महाराष्ट्रातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
मुंबईहून परप्रांतीय अथवा उत्तर भारतीयांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांचा हा व्हिडिओ आहे का? असल्यास तो कोणत्या रेल्वेस्थानकावरील आहे असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर उभे राहिले. त्यामुळे हा व्हिडिओ नीट पाहिला त्यावेळी या व्हिडिओत रेल्वेस्थानकावरील एक फलक आम्हाला दिसून आला. या फलकावर आसनसोल जं. असे लिहिले असल्याचे दिसून आले.

त्यानंतर आसनसोल रेल्वेस्थानक नेमके कुठे आहे? याचा घेतला असता ते पश्चिम बंगाल या राज्यातील बर्धमान जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. विविध शब्दप्रयोग करत शोध घेतला असता टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने 5 मे 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार केरळ आणि कर्नाटकातील स्थलांतरित मजुरांना दानापूर येथे नेत असताना ही घटना घडली. शिळे आणि खाण्यास लायक नसलेले अन्न दिल्याने चिडलेल्या मजुरांनी रेल्वेकडून देण्यात आलेले ही अन्नाची पाकिटे फेकुन दिली.
युटुयूबवर 99 न्यूजने देखील याबाबत वृत्त दिल्याचे दिसून येते. तेथील स्थानिक नागरिकांनी याबाबत दिलेली प्रतिक्रियाही या वृत्तवाहिनीने दाखवली आहे.
यातून हे स्पष्ट झाले की, ही रेल्वेगाडी महाराष्ट्रातून जाणारी नसून हा व्हिडिओ देखील महाराष्ट्रातील नाही.
निष्कर्ष
रेल्वेस्थानकावर अन्नाची पाकिटे फेकून देणाऱ्या प्रवाशांचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील परप्रांतीयांसाठी सोडलेल्या रेल्वेगाड्यांचा नाही. तो पश्चिम बंगालमधील रेल्वेस्थानकावरील आहे.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:पश्चिम बंगालमध्ये परप्रांतियांनी अन्नाची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
