महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी घरी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, या दाव्यासह एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, या पोस्टरमधील माहिती भ्रमक आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणताही योजना सुरू केली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टरमध्ये लिहिलेले आहे की, “महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल, तर महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागू शकतात. नियंत्रण कक्ष वाहन (PCR) किंवा स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) वाहन घेऊन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल. हि सेवा विनामूल्य आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड्स सर्च केल्यावर न्यूज-18 च्या वेबसाईटनुसार, 2 डिसेंबर 2019 रोजी लुधियाना पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान वाहन नसणाऱ्या महिलांना घरी सुरक्षित पोहचविण्यासाठी ‘मोफत राईडची सेवा’ सुरू केली होती.

त्यासाठी महिलांना पोलीस हेल्पलाइन क्रमांक 1091 किंवा 7837018555 वर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने लुधियानाचे तत्कालिन पोलिस आयुक्त राकेश अगरवाल यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले होते की, रात्री उशिरा घरी जाण्यासाठी व्यवस्था नसेल तर महिलांनी 1091 किंवा 7837018555 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिसांच्या वाहनातून महिलांना सुरक्षित घरी पोहचविण्यात येईल.

पुढे कळाले की, लुधियानामध्ये हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसांत सुमारे तीन हजार कॉल आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

लुधियानामध्ये ही सेवा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये हिच सेवा सुरू करण्यात आली आहे, असा दावा व्हायरल होऊ लागले.

चार वर्षांपूर्वी बंगळुरूमध्येदेखील हाच मेसेज व्हायरल झाला होता. तेव्हा बंगळुरू शहर पोलिसांनी या व्हायरल दाव्यांचे आपल्या अधिकृत फेसबुक आकांवरून खंडन केले आणि असा मेसेज पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

महाराष्ट्रात अशी कोणती सेवा आहे का ? याचा पाठपुरावा केल्यावर कळाले की, 2019 मध्ये नागपूर पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी घरी सोडण्याची योजना सुरू केली होती.

नागपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर 4 डिसेंबर 2019 रोजी या सेवेची माहिती पोस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये आवाहन करण्यात आल होते की, नागपूर शहरात रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान महिलांना घरी जाण्यासाठी ‘होम ड्रॉप’ सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

“नागपूर शहरात रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान महिलांना घरी जाण्यासाठी मोफत राईड सेवा करण्यात आली होती. महिलांनी वाहन मिळवण्यासाठी 100, 1091 किंवा 07122561103 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.”

https://twitter.com/NagpurPolice/status/1202135205701488640?s=20

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी सोडण्यासाठी कोणती योजना सुरू केली नाही. हा हेल्पलाइन क्रमांक लुधियाना शहरातील असून तिथे ही योजना उपलब्ध आहे. महाराष्ट्रात केवळ नागपूर शहरात महिलांसाठी ‘होम ड्रॉप’ सुरू आहे. परंतु, इतर ठिकाणी गरज पडल्यास स्थानिक पोलिसांनी मदत मागितली जाऊ शकते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रात्रीच्या वेळी महिलांना घरी सोडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘मोफत राईड योजना’ सूरू केली नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Partly False