
दिल्लीत मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश एस. मुरलीधर सध्या चर्चेत आहे. त्यांची नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयातून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अर्ज भरतानाचा एक फोटो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, यावेळी त्यांच्यासोबत न्यायाधीश एस. मुरलीधर होते.
फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टकर्त्याने लिहिले की, ‘हेच ते न्यायमूर्ती मुरलीधर…सोनिया गांधीचे निवडणूक अर्ज भरून भरून न्यायमूर्ती झाले होते!!’
तथ्य पडताळणी
सदरील छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला काँग्रेसच्या ट्विटर खात्यावरुन 11 एप्रिल 2019 रोजी करण्यात आलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटसोबत देण्यात आलेल्या ओळीत म्हटले आहे की, रायबरेलीतून चार वेळा खासदार असलेल्या युपीए अध्यक्षा सोनिया गांधी 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना.
सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरत असतानाचे हे छायाचित्र असल्याचे तर स्पष्ट झाले पण सोनिया गांधी यांच्यासोबत असणारी ही व्यक्ती कोण, हा प्रश्न मात्र कायम होता. त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी सोनिया गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रावर आम्हाला के. सी. कौशिक यांची स्वाक्षरी असल्याचे आम्हाला दिसून आले.
के. सी. कौशिक हे कोण आहेत, याचा आम्ही शोध घेतला असता ते सर्वोच्च न्यायालयात वकील असल्याचे आम्हाला दिसून आले. के. सी. कौशिक यांनी याबाबत खुलासा केल्याचा एक व्हिडिओ देखील आम्हाला दिसून आला.
निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, छायाचित्रातील व्यक्ती ही न्यायाधीश एस. मुरलीधर हे नाहीत. ते सर्वोच्च न्यायालयातील वकील के. सी. कौशिक हे आहेत.

Title:सोनिया गांधींचा निवडणूक अर्ज भरताना त्यांच्यासोबत न्यायाधीश एस. मुरलीधर नव्हते. वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
