
डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी पद्मशीला तिरपुडे नावाची ही महिला जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक झाली, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र कोणाचे आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
काय आहे दावा?
पोलीस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे यांचे डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करत असतानाचे हे छायाचित्र आहे.
तथ्य पडताळणी
डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करत असतानाचे हे छायाचित्र पद्मशीला तिरपुडे यांचे आहे का, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हे छायाचित्र आपले नसल्याचे स्पष्ट केले. जीवनात मी संघर्ष केला मात्र मी खलबत्ते आणि वरवंटे विकले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने त्यांची यशोगाथा दिली असल्याचे दिसून आले. दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर असलेले एक वृत्तही दिसून आले. या वृत्तात सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या तिरपुडे यांनी हे छायाचित्र आपले नसल्याचे स्पष्ट करतानाच आपला जीवनप्रवासही मांडला आहे.
निष्कर्ष
नागपूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पद्मशीला तिरपुडे यांचे डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करत असतानाचे हे छायाचित्र असल्याचा दावा असत्य आहे.

Title:पद्मशीला तिरपुडे यांच्या नावाने व्हायरल होणारे छायाचित्र चुकीचे; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
