राहुल गांधी बटाट्यापासून सोने तयार करण्याची मशीन लावणार असे म्हणाले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भाषणाची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, “मी अशी एक मशिन लावणार जी एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूला सोने बनून बाहेर पडेल.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात राहुल गांधी म्हणतात की, बटाट्यापासून सोने तयार करण्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये “उद्या ही मशीन मिळणार सोलापूरकरांना.” असे लिहिलेले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, राहुल गांधी यांची व्हायरल व्हिडिओ क्लिप 13 नोव्हेंबर 2017 रोजी गुजरातमधील पाटण येथील भाषण करतानाची आहे.

राहुल गांधी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

वरील संपूर्ण भाषण पाहिल्यावर लक्षात येते की, राहुल गांधी हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होते.

राहुल गांधी 17.50 मिनिटापासून बोलतात की, “भाजप सरकारने टाटा नेनॉ कंपनीला मोठी आर्थिक मदत देऊन कंपनी उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवल्या, पण याचा फायदा गुजरातच्या जणतेला झालाच नाही.”

पुढे ते सांगतात की, “गुजरातमधील आदिवासी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोकांना करोडो रूपये देण्याचे वचन देऊन त्यांना एकही रूपया दिला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटाटा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वचन दिले होते की, ते अशी मशीन बसवतील की, तीत एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूने सोने बाहेर पडेल. हे माझे शब्द नसून नरेंद्र मोदींचे आहेत.”

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात राहुल गांधी म्हणतात की, बटाट्यापासून सोने तयार करण्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधी बटाट्यापासून सोने तयार करण्याची मशीन लावणार असे म्हणाले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply