जिन्स घातलेली ही मुलगी ‘हिजाब गर्ल’ मुस्कान खान नाही; दुसऱ्याच मुलीचे फोटो तिच्या नावे व्हायरल

False सामाजिक

कर्नाटकमध्ये हिजाब वाद सुरू असताना ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देत जमावाला सामोरे जाणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. मुस्कान खान नामक तरुणीच्या या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक झाले. 

यानंतर जीन्स आणि इतर मॉडर्न कपडे घातलेल्या एका मुलीच्या फोटोंचा कोलाज शेअर करून दावा केला जात आहे, कॉलेजमध्ये हिजाबसाठी आग्रही असणारी मुस्कान खान इतरत्र मात्र हिजाब न घालताच वावरते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हे फोटो मुस्कान खानचे नाहीत. ते तर दुसऱ्याच मुलीचे फोटो आहेत. 

काय आहे व्हायरल फोटोत?

जीन्स पँट आणि इतर मॉडर्न कपड्यांमधील मुलगी आणि बुरख्यातील मुलीच्या फोटोंचा कोलाज शेअर करून म्हटले की, “शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब किंवा बुरखे घालायला परवानगी द्या या मागणीसाठी हायकोर्टात गेलेली उडपीची ती.विद्यार्थिनी इतरत्र मात्र हिजाब शिवाय वावरत असल्याचे फोटो तिनेच इन्स्टाग्रामवर टाकलेत. हिला शाळेतच का हिजाब घालायचाय? ही नुकतीच सोबतच्या लोकांच्या संगतीनं बिघडली? की टुकडे टुकडे गँगचा देशात दंगली भडकावण्याचा कट?”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाहुया की हिजाब गर्ल मुस्कान खान कोण आहे. 

मुस्कान खान कर्नाटकमधील मांड्या शहरातील कॉलेज विद्यार्थिनी आहे. गेल्या आठवड्यात हिजाब घालण्यावरून विविध शहरांमध्ये हिंसक प्रदर्शन झाले होते. त्यावेळी मुस्कान हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत मुलांचा एक घोळका तिच्या देशेने चालत आला होता. मग ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देत ती त्यांना सामोरे गेली होती.

मॉडर्न कपड्यांतील ती मुलगी कोण?

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ती मुलगी कर्नाटकमधील जनता दल (सेक्युलर) पक्षाशी निगडित कार्यकर्ती नजमा नझीर चिक्कनराले आहे. तिच्या फेसबुकवर व्हायरल कोलाजमधील फोटो उपलब्ध आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोने नजमाशी संपर्कदेखील साधला. ती म्हणाली की, “हिजाब गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली मुस्कान खान मी नाही. माझे नाव नजमा असून मी जनता दल (से.) पक्षासाठी काम करते. माझ्या फोटोंना चुकीच्या दाव्यासह शेअर करून लोक फेक न्यूज पसरवित आहेत.”

मूळ फोटो – फेसबुकफेसबुकफेसबुकफेसबुक

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नजमा नझीर नामक मुलीचे फोटो ‘हिजाब गर्ल’ मुस्कान खानच्या नावाने व्हायरल होत आहेत. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जिन्स घातलेली ही मुलगी ‘हिजाब गर्ल’ मुस्कान खान नाही; दुसऱ्याच मुलीचे फोटो तिच्या नावे व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False