
सोशल मीडियावर सध्या घरी बसून हजारो रुपये कमविण्याची संधी देणाऱ्या जाहिराती व्हायरल होत आहेत. यात दावा केला जात आहे की, नटराज कंपनीद्वारे घरी बसून पेन/पेन्सिल पॅकिंग करण्याचे काम देण्यात येत आहे. यासाठी आगाऊ 15 हजार आणि मासिक 30 हजार रुपये पगार मिळणार, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, ही फसवी जाहिरात असून नटराज कंपनीतर्फे अशी कोणतीही नोकरी दिली जात नाही.
काय आहे दावा?

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम नटराज कंपनीतर्फे खरंच अशी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली का याची माहिती घेतली. नटराज कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली असता कळाले की, कंपनीच्या नावाने फेक जाहिराती व्हायरल होत आहेत.
कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर यासंबंधी खुलासा करणारा व्हिडिओ आढळला. यात स्पष्टपणे म्हटले आहे की, नटराज व अप्सरा पेन्सिलच्या नावाने भरघोस वेतन कमविण्याच्या बोगस जाहिराती सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. कारण याद्वारे वैयक्तिक माहिती (आधार कार्ड, पॅन क्रमांक, बँकेची माहिती इ.) मिळवून आर्थिक लूट केली जाऊ शकते.
नटराज पेन्सिल पॅकेजिंगची प्रक्रिया संपूर्णतः स्वयंचलित आहे. पेन्सिलची ब्रँडिंग व पॅकेजिंग मशीनद्वारे करण्यात येते. या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नसते.
नटराज कंपनीतर्फे फेसबुकवरदेखील एक पत्रक जारी केलेले आहे. यामध्ये कंपनीने खुलासा केला की, अशा जाहिरातींना बळी पडून होणाऱ्या फसवणुकीस कंपनी जबाबदार राहणार नाही. नटराज व अप्सरा पेन्सिल घरी बसून पॅकेजिंगचे काम देत नाही.
अशा बनावट नोकरीच्या फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे कंपनीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, नटराज कंपनीच्या नावाने बनावट नोकरीच्या जाहिराती शेअर केल्या जात आहे. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहान कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नटराज कंपनी घरबसल्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी देत नाही; फसव्या जाहिराती व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
