
एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईच्या डोंगरी भागातील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका फिल्मच्या शूटिंगचा असून, हा काही खराखुरा खून नाही.
काय आहे दावा?
20 सेंकदाच्या क्लिपमध्ये तीन-चार जण एका व्यक्तीला दिवसाढवळ्या गोळ्या घालतात. कॅप्शनमध्ये म्हटले की, “शिवसेना आणि काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईच्या डोंगरी भागात असा ‘गुंडाराज’ पाहायला मिळतोय.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ कुठला आहे हे निश्चित करुया. व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केल्यावर वरच्या बाजुला “Anisha’s” असे लिहिलेला एक बोर्ड दिसतो.
गुगलवर याबाबत सर्च केल्यावर या नावाच्या अनेक दुकाने व गुगल मॅपमवर नोंदणीकृत व्यापारी आस्थापने सापडली. त्यातून शोध घेतल्यावर गोव्याच्या मापुसा येथील Anisha’s नावाच्या एका दुकानाचा बोर्ड आणि व्हायरल व्हिडिओतील बोर्ड हे दोन्ही सारखेच आहेत.

हा धागा पकडून युट्यूबवर कीवर्ड्स द्वारे सर्च केल्यावर गोव्यातील मापुसा येथे झालेल्या एका चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक व्हिडिओ सापडले.
याच घटनेचा वेगळ्या अँगलनेदेखील व्हिडिओ उपलब्ध आहे. या व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसते की, ही एक शूटिंग आहे. आजुबाजुला लोकदेखील चित्रकरण पाहत उभे आहेत. मापुसा मार्केटमध्ये ही शूटिंग झाली होती.
फॅक्ट क्रेसेंडोने मुपासा ठाण्याशी संपर्क साधला. तेथील पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर आणि गजानन प्रभुदेसाई यांनी हा व्हिडिओ मापुसा येथील फिल्म शूटिंगचा असल्याचे सांगितले.
“हा व्हिडिओ खऱ्या खूनाचा नाही. ही केवळ फिल्म शूटिंग होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मापुसा नगरपालिका बाजार भागात ही शूटिंग पार पडली होती. चुकीच्या दाव्याने ही क्लिप व्हायरल होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, गोव्यामध्ये झालेल्या एका फिल्म शूटिंगची क्लिप मुंबईतील खूनाचा म्हणून व्हायरल होत आहे. परंतु, तसे काही झालेले नाही.

Title:फिल्म शूटिंगचा व्हिडिओ मुंबईत दिवसाढवळ्या खूनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
