
भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम हिने जागतिक क्रमवारीमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावून जगात पहिल्या क्रमांकाची महिला बॉक्सर होण्याचा मान मिळवला, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. मेरी कोमच्या या यशाबद्दल चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत. परंतु, अनेकांनी याविषयी शंकादेखील उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
सहा जून रोजी शेयर केलेल्या या पोस्टमध्ये मेरी कोमचा फोटो शेयर करून लिहिले की, मेरी कोम परत बनली जगातील नंबर एकची महिला बॉक्सर. सलाम ह्यांच्या अभिमानास्पद कार्याला.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम गुगलवर मेरी कोमविषयी शोध घेतला असता अशी कोणतीही बातमी अलिकडे आल्याचे आढळले नाही. मेरी कोम पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल आली असती तर ही नक्कीच मोठी बातमी ठरेल. सर्व दैनिक आणि मीडिया वेबसाईट्सवर ही बातमी झळकली असती. परंतु, तसे काही फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत समोर आले नाही.
पोस्टमध्ये ‘पुन्हा’ असे म्हटले आहे. म्हणजे यापूर्वी मेरी अव्वल ठरली होती. त्यानुसार सर्च केले असता, जानेवारी महिन्यातील अनेक बातम्या सापडल्या. इंडिया टुडेने 10 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या बातमीनुसार, मेरी कोम हिने इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या जागतिक बॉक्सिंग क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. महिलांच्या लाईट प्लाय (45-48 किलोग्रॅम) वजन गटात 1700 गुणांसह ती प्रथम क्रमांकाची बॉक्सर ठरली होती.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
दैनिक लोकसत्तानेदेखील ही बातमी दिली होती. त्यात म्हटले की, कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरी कोम हिने हा सन्मान मिळवला आहे. मेरीसाठी 2018 हे साल खूपच फलदायी ठरले. राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले होते. नवी दिल्लीत मे महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटात सुवर्ण पटकावले होते.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
या बातमीनंतर अनेकांनी मेरी कॉमला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते. मेरीच्या अधिकृत ट्विटर अकांउटवर याचा शोध घेतला असता अनुष्का शर्माने मेरीला वर्ल्ड नंबर एक झाल्याबद्दल जानेवारी महिन्यात केलेले ट्विट आढळले. या ट्विटला मेरी कोमने उत्तर दिले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. परंतु, मेरीच्या अकाउंटवर जून महिन्यात अशा प्रकारचे कोणतेही ट्विट आढळले नाही.
(Twitter Link)
इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील अलिकडे क्रमवारी जाहीर केल्याची कोणतीही माहिती नाही. असोसिएशनने जानेवारी महिन्यातच शेवटची क्रमवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार महिलांच्या लाईट फ्लाय वजन गटात एम. सी. मेरी कोमला डिसेंबर 2018 पर्यंत 1700 पॉईंट्स मिळाले होते. त्यामुळे ती या गटात नंबर एकची बॉक्सर ठरली.

मूळ रँकिंग येथे पाहा – AIBA Ranking
निष्कर्ष
मेरी कोमने जागतिक क्रमवारीत अलिकडे पुन्हा अव्वल स्थान पटकावले नसून, गेल्यावर्षीच्या क्रमवारीत ती प्रथम ठरली होती. जागतिक रँकिंग जाहीर करणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनतर्फे जून महिन्यात कोणतीही क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:BOXING FACT: खरंच मेरी कोमने जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
