नीट-पीजी 2024 परीक्षेमधील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक विद्यार्धी नीट-पीजी परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) विरोधत करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांची संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा न देताच आयएएस अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला खोटा आहे. अंजली बिर्लाने 2019 मध्ये रीतसर यूपीएससीची परीक्षा दिली आणि 2021 मध्ये तिची प्रशासकीय सेवेत निवड झाली.

काय आहे दावा ?

युजर्स हा दावा करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नरेंद्र मोदींच्या भाजप मंत्र्यांची मुले-मुली परीक्षा न देता IAS होतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

दावा केला जात आहे की, ध्रुव राठीनेदेखील ट्विट केले की, “अंजली बिर्ला यांनी परीक्षा न देता UPSC परीक्षा पास केले.”

मूळ पोस्ट – ट्विट | आर्काइव्ह

सर्व प्रथम कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, ध्रुव राठीने ‘अंजली बिर्ला’ संबंधित कोणतेही ट्विट केले नाही.

ध्रुव राठीच्या नावाने व्हायरल होणारी पोस्ट त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून करण्यात आली नाही. हे ध्रुव राठीच्या नावाने तयार केलेले एक पॅरिडी (मूळ स्वरूपाचाच वापर करून केलेले विनोदी किंवा उपहासात्मक अनुकरण.) अकाउंट आहे.

पुढे कीव्हर्ड सेर्च केल्यावर कळाले की, अंजली बिर्लाने 2019 मध्ये रीतसर यूपीएससीची परीक्षा दिली होती.

यूपीएससीने 4 जानेवारी 2021 रोजी नागरी सेवा (मुख्य) परीक्षेची (2019) राखीव यादी जाहीर केली होती. यामध्ये यादी एकुण 89 उमेदवारांची नावे होते. ज्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव 67 क्रमांकावर आहे. सोबत त्याचा अनुक्रमांकसुद्धा (0851876) दर्शविलेला आहे.

ही यादी जाहीर करताना आयोगाने स्पष्ट केले की, सदरील 89 जणांची ही राखीव यादी (Consolidated Reserve List) आहे. नागरी सेवा परीक्षेचा (2019) अंतिम निकाल 4 ऑगस्ट 2020 रोजी लागला होता. त्यावेळी 927 रिक्त पदांसाठी आयोगाने पहिल्यांदा 829 उमेदवारांचा निकाल जाहीर केला आणि त्याचबरोबर राखीव यादीसुद्धा तयार केली होती.

येथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे, यूपीएससीची परीक्षा दिली असेल तरच या यादीमध्ये उमेदवाराचे नाव येऊ शकते.

अर्थात, अंजली बिर्ला यांचे नाव यादीत आहे म्हणजेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आहे.

मूळ पोस्ट – संघ लोकसेवा आयोग

UPSC चे तीन टप्पे

प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला तीन टप्पे पार करावे लागतात.

सर्वप्रथम उमेदवार पूर्वपरीक्षा देतात. या परीक्षेमध्ये जे पास होतात तेच पुढील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. पुढे मुख्य परीक्षेत ज्यांची निवड होते त्यांना आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. अखेर, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाते.

अंजली बिर्ला यांनी हे तीन्ही टप्पे पार केले आहेत.

आयोगाच्या वेबसाईटवर नागरी सेवा परीक्षेच्या (2019) पूर्वपरीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षेचा निकाल उपलब्ध असून या दोन्ही निकालांमध्ये अंजली बिर्ला यांचा अनुक्रमांक (0851876) आहे. म्हणजेच त्यांनी या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर त्या मुलाखतीसाठी पात्र ठरल्या.

पूर्वपरीक्षा निकाल

मुख्य परीक्षा निकाल

पुढे निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलखतींचे वेळापत्रकमध्ये देखील अंजली बिर्लाचा अनुक्रमांक (0851876) आहे. 20 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वाजता त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते.

राखीव यादी काय असते?

नागरी सेवा परीक्षेचा (2019) अंतिम निकाल 4 ऑगस्ट 2020 रोजी लागला आणि त्यात अंजलीचे नाव नव्हते तरी राखीव यादी जाहीर करून मुद्दामहून त्यांची निवड करण्यात आली, असासुद्धा आरोप करण्यात येतो.

परंतु, हा दावा निराधार आहे. नागरी सेवा परीक्षा नियम 2019 च्या नियम -16 (4) आणि (5) मध्ये अशी राखीव यादी तयार करण्याची तरतूद आहे.

खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांनी जर आरक्षित स्थितीनुसार सेवा आणि केडर निवडले तर एक खुली जागा रिक्त होऊ शकते. असे झाल्यास ती भरून काढण्यासाठी राखीव यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. थोडक्यात काय तर ही एक प्रकारची वेटिंग लिस्ट असते. अधिक महिती आपण येथे वाचू शकता.

अंतिम निकाल निवड झालेल्या उमेदवारांची प्राधान्य निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राखीव यादी गोपनीय ठेवण्यात येते. त्यामुळे अंजली बिर्ला यांची निवड काही कायद्याबाह्यपद्धतीने झालेली नाही.

या पुर्वीदेखील अंजली बिर्ला यांची ‘लॅटरल एंट्री’ मधून थेट आयएएस अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीअंती कळाले की, अंजली बिर्ला यांनी रीतसर यूपीएससीची परीक्षा दिली असून लॅटरल एन्ट्रीद्वारेसुद्धा तिची वर्णी लागलेली नाही. संपुर्ण फॅक्ट-चेक अपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. अंजली बिर्ला यांनी रीतसर यूपीएससीची परीक्षा दिली असून त्यांची निवड कायद्याबाह्यपद्धतीने झालेली नाही. खोट्या दाव्यासह हा दावा व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगीची परीक्षा न देताच आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली का ? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: False