VIDEO: कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर पाऊस पडला नाही. जाणून घ्या सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी निसर्गाच्या अनाकलनीय करामती पाहून आजही थक्क होऊन जातो. अशीच एक “चमत्कारीक” गोष्ट कोकणातील कणकवली येथे घडल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळ्याला सुरुवात झाली असून धो-धो पाऊस पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील एक व्हायरल व्हिडियोमध्ये दावा केला जात आहे की, कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर मुसळधार पाऊस पडला. हा व्हिडियो नेटिझन्समध्ये चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटसअ‍ॅपवर (9049043487) संपर्क साधून या व्हिडियोची सत्यता पडताळण्याची विनंती केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज/पोस्टमध्ये सुमारे दोन मिनिटांचा व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये एकाच जागेवर मुसळधार पाण्याची सर पडताना दिसते. अनेक लोकसुद्धा आसपास जमा झालेले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, निसर्गाचा चमत्कार. कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर पाऊस पडला…अद्भूत द्रुश्य!

तथ्य पडताळणी

व्हिडियोसंदर्भात केलेला दावा आणि मूळ व्हिडियोमध्ये विसंगती आहे. व्हिडियोत लोक जी भाषा बोलत आहेत ती कणकवली येथील नाही. तसेच पाण्याचा फोर्स एवढा जास्त आहे की, पाऊस एवढ्या जोराने पडू शकतो का असा प्रश्न पडतो. त्यामुळे व्हिडियोच्या सत्यतेबाबत शंका घेण्यास वाव आहे. गुगलवर सर्च केल्यावर सदरील व्हिडियो गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध असल्याचे आढळून आले. युट्यूबवर 20 मे 2016 रोजी अपलोड केलेला हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये म्हटले की, हा व्हिडियो टोगो देशातील पलिम येथील आहे. 

जगभरातील अनेक वेबसाईट्सने या व्हिडियोची पडताळणी करून तो खोटा ठरविला आहे. स्नोप्स वेबसाईटनुसार, हा व्हिडियो 2015 पासून इंटरनेटवर उपलब्ध असून, तो टोगो येथील असल्याचा कोणताही पुरावा नाही. हा व्हिडियो तेव्हापासून इंटरनेटवर विविध दाव्यांसह फिरत आहे. मूळात या व्हिडियोत दिसणारी घटना कुठे घडली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. कोणी याला आफ्रिकेतील देशात घडल्याचे म्हणतात, तर कोणी व्हिएतनाम, कोरिया येथील असल्याचे सांगतात. परंतु, व्हिडियोचे उगमस्थान अद्याप माहित नाही.

मग खरंच एकाच जागी पाऊस पडला का?

व्हिडियो पूर्ण पाहिला असता लगेच कळते की, असा काही चमत्कार वगैरे काही घडलेला नाही. कारण व्हिडियोच्या सुरुवातीला झाडाच्या पानांआडून आकाशातून पाणी खाली पडत असल्याचे दिसते. मात्र 37 व्या सेकंदाला पाण्याच्या धारेचे टोक दिसते. त्यानंतर 1.11 मिनिटापासून स्पष्ट दिसते की पाणी आकाशातून नाही तर, जमिनीतून वर येत आहे. खाली दिलेल्या जीआयएफ इमेजवरून ते अधिक चांगल्यारित्या समजून येईल.

व्हिडियोमध्ये आकाशातून एकाच ठिकाणी पाऊस पडत नसून, हाय प्रेशर पाईप फुटल्यामुळे पाण्याचा असा उंच फवारा उडत असावा. यापूर्वीदेखील अशा तऱ्हेचे व्हिडियो समोर आलेले आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात 2012 साली असाच पाईप फुटून आकाशात सुमारे 205 फूट उंच पाण्याचे कारंजे उडाले होते. या घटनेचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

इस्रायल लारेय नावाच्या एका पत्रकाराने घाना येथील असाच एक व्हिडियो 2016 साली शेयर केला होता. तेथे सुद्धा हाय-प्रेशर पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने पाण्याचा असा उंच फवारा जमिनीतून बाहेर पडत होता. खाली दिलेला व्हिडियो जर पाहिला तर त्यातसुद्धा एकाच ठिकाणी पाऊस पडत असल्याचा भास होऊ शकतो. परंतु, तसे काही झालेले नाही.

अर्काइव्ह

निष्कर्ष

एकाच ठिकाणी पाऊस पडत असल्याचा व्हिडियो कणकवली येथील नाही. मुळात हाय प्रेशर-पाईप फुटल्यामुळे पाणी जमिनीबाहेर पडून आकाशात उंच जाताना यामध्ये दिसते. सदरील व्हिडियो 2015 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य ठऱते.

Avatar

Title:VIDEO: कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर पाऊस पडला नाही. जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False