
एका व्हायरल पोस्टनुसार, नुकतेच अटक करण्यात आलेल्या नीरव मोदीने लंडनच्या कोर्टात सांगितले की, भाजप नेत्यांनी 456 कोटी रुपये कमिशन घेऊन त्याला भारताबाहेर पळण्यास मदत केली. या पोस्टमध्ये न्यूज18 इंडिया या वृत्तवाहिनीचे ट्विटदेखील दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

धनंजय बोडके या युजरने 22 मार्च रोजी वरील पोस्ट अपलोड केली होती. सोबत लिहिले की, बघा शेवटी रावणाला गर्व असल्यामुळे लंका जाळली मग या मोदींचा चोरांना किती वेळ लागणार आहे…
सचिन फळे या युजरने “10 लाख राजसाहेब समर्थकांचा ग्रुप जो add होईल त्याने पुढील १० जणांना Add करा” नावाच्या ग्रुपवर 22 मार्च रोजी वरील पोस्ट केली होती. यामध्ये त्याने लिहिले की, म्हणुनच म्हणतोय. चौकीदारावर भरोसा ठेवायचा नसतो. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 380 वेळा शेयर करण्यात आली.
तथ्य पडताळणी
व्हायरल पोस्टमध्ये न्यूज18 इंडिया वाहिनीच्या ट्विटचा दाखला देत लिहिलेले आहे की, लंदन कोर्ट में नीरव मोदी का बडा बयान. भागा नहीं भगाया गया. 456 करोड कमिशन लिया भाजप नेताओं ने.
परंतु, ट्विटमधील बातमीचे शीर्षक – PNB में करोडो का घोटाला करने वाला नीरव मोदी एक बैंक कर्मचारी के जरिए हुआ… – वरील दाव्यापेक्षा वेगळेच आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम या ट्विटची सत्यता तपासली. फोटोतील ट्विटर हँडलवरून न्यूज18 इंडिया वाहिनीचे अधिकृत अकाउंट मिळाले. त्यावर शोध घेतला असता खालील ट्विट आढळले.
या ट्विटमधील बातमीची लिंक आणि व्हायरल पोस्टमधील बातमीची लिंक सारखीच आहे. या लिंकवर क्लिक केले असता न्यूज18 इंडियाच्या वेबसाईटवरील एक बातमी उघडते. या बातमीत नीरव मोदीला कशा प्रकारे एका बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली याची माहिती दिली आहे. बातमीत कुठेही नीरव मोदीने भाजपच्या नेत्यांना 456 कोटी रुपयांची लाच देऊन पळाल्याचा उल्लेख नाही.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज18 इंडिया । अर्काइव्ह
व्हायरल पोस्ट आणि मूळ ट्विट यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होते की, पोस्टमधील ट्विट फोटोशॉप केलेले आहे.

मग प्रश्न उरतो की, नीरव मोदीने लंडनच्या कोर्टात काय सांगितले?
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यामधील प्रमुख संशयित आरोपी आहे. गेल्या एका वर्षापासून तो फरार आहे. एएनअय (ANI) च्या वृत्तानुसार, स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला 19 मार्च रोजी (मंगळवारी) अटक केली. त्याला बुधवारी (20 मार्च) वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता 29 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
नीरव मोदीने 5 लाख पाउंड (4.5 कोटी रुपये) मुचलक्यावर जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायाधीश मारी मेलन यांनी जामीन अर्ज नामंजुर करीत त्याची वँड्सवर्थ येथील एचएम तुरुंगात रवानगी केली.

मूळ बातमी येथे वाचा – ANI । अर्काइव्ह
रॉयटर्स या प्रतिष्ठत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने यासंदर्भात 21 मार्च रोजी दिलेल्या बातमीत स्पष्ट दिले की, नीरव मोदीने कोर्टात काय म्हटले. बातमीनुसार, कोर्टामध्ये नीरव मोदीने केवळ त्याचे नाव, वय, आणि पत्ता सांगितला. तसेच भारतात प्रत्यार्पण करण्यासही त्याने नकार दिला. म्हणजेच, भाजप नेत्यांना 456 कोटी रुपये दिल्याचे त्याने न्यायालयात सांगितलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – रॉयटर्स । अर्काइव्ह
निष्कर्ष
व्हायरल पोस्टमधील ट्विट फोटोशॉप केलेले असून नीरव मोदीने लंडनच्या कोर्टात भाजपच्या नेत्यांना 456 कोटी रुपयांचे कमिशन दिल्याचे कबुल केलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:तथ्य पडताळणीः खरंच भाजप नेत्यांना 456 कोटी देऊन पळाला नीरव मोदी?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
