
रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि हिरे व्यापारी रसेल व मोना मेहता यांची मुलगी श्लोका यांचा शाही विवाह सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. चित्रपट, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील लोकप्रिय मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये या लग्नात भारतीय सैनिकांनादेखील बोलाविण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु, नीता अंबानी यांनी सैनिकांचा वापर केवळ फोटोसेशनसाठी केल्याचा आरोप करीत या पोस्टमध्ये केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
प्रकाश रेड्डी नामक यूजरने 14 मार्च रोजी फेसबुकवर नीता अंबानी यांचा सैनिकांसोबतचा एक फोटो अपलोड केला होता. यासोबत त्यांनी लिहिले की, “भारतीय सैन्यदलाचा वापर लग्नात बोलाऊन पोलीस बॅन्ड व ईतरांबरोबरोबर फोटोसेशन करणाऱ्या नीता अंबानी व अंबानी भांडवलदार घराण्याचा तीव्र निषेध…एखाद्याच्या लग्नात सैन्यदल जाऊ शकतात काय..संरक्षणमंत्री निर्मला सितारामन जवाब दो..”
अनेकांनी या पोस्टखाली अंबानी कुटुंबावर निशाणा साधत भांडवलशाहीचा निषेध केला. एकाने लिहिले की, “धिक्कार असो! भारतीय लष्कराला अंबानीचे रखवालदार बनविण्यासाठी माझा ठाम विरोध.” एका यूजरने तर थेट “सैन्यप्रमुखांनी या घटनेची चौकशी करावी” अशी मागणी केली. तसेच या पोस्टचा आधार घेत मोदी सरकारवरदेखील अनेकांनी टीका केली. मग काय आहे सत्य?
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टमधील फोटोला गुगल इमेज रिव्हर्स सर्च केले. यातून इंडिया टुडेने 13 मार्च रोजी दिलेली बातमी समोर आली. या बातमीनुसार, सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांचे आशीर्वाद नवदाम्पत्याला मिळावे यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी 12 मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सैन्य, नौदल, अर्धसैनिक बल, मुंबई पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलातील हजारो अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
या बातमीत या कार्यक्रमातील अनेक फोटोदेखील दिलेले आहेत. त्यामध्ये फेसबुकवर शेयर करण्यात आलेला नीता अंबानी यांचा फोटोदेखील आहे.

द इकोनॉमिक टाईम्सनेदेखील या कार्यक्रमाची बातमी दिली आहे. यात म्हटले की, मुंबईतील वांद्रेस्थित जिओ वर्ल्ड सेंटरमधील धीरुभाई अंबानी स्क्वेयर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुमारे 7 हजार सुरक्षा दलातील जवान आणि कुटुंबीय सहभागी झाले होते.
म्युझिकल फाउंटन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. संगीताच्या तालावर 600 एलईडी लाईट्सच्या रोषनाईत 45 फुटांपर्यंत उंच लयदार कारंज्याचे नृत्य संमोहित करणारे होते. त्यासोबत कलाकारांचा एरियल डान्सदेखील उपस्थितांसाठी पर्वणी ठरला.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक टाईम्स
रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत युट्ब चॅनेलवरून या कार्यक्रमाचे 12 मार्च रोजी लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते. त्याचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोमध्ये या कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना नीता अंबानी म्हणतात की, “या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवान आणि सैन्य अधिकाऱ्यांचे मी हातून जोडून स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम केवळ तुमच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. भारताला जगात जो मानसन्मान मिळतो, त्यासाठी आपले शुरवीर जवान कारणीभूत आहेत. सैनिकांप्रती आदर म्हणून रिलायन्स फाउंडेशन शहीद जवानांच्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. तसेच सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी खास कौशल्य विकास केंद्रदेखील सुरू करण्यात येणार आहे.”
म्हणजे नीता अंबानीचा सैनिकांसोबतचा फोटो या विशेष कार्यक्रमातील आहे. नीता अंबानी यांच्या मुलाचे लग्न 9 मार्च रोजी झाले. त्यानंतर 10 मार्च रोजी मंगल पर्व हा कार्यक्रम झाला. 11 मार्च रोजी लग्नाचे रिसेप्शन होते. आकाश अंबानीच्या लग्न पत्रिकेवरून हे स्पष्ट होते.
सैनिकांसाठीचा हा खास कार्यक्रम 12 मार्च रोजी पार पडला. यामध्ये सैनिकांना बोलविण्यात आले होते. म्हणजे सैनिकांना लग्नात नाही तर या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते.
मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी इशानेदेखील तिच्या इन्टाग्रामवर आईचा खालील फोटो शेयर केला होता.
निष्कर्ष
पडताळणीतून हे सिद्ध होते की, नीता अंबानी यांनी सैनिकांना लग्नाला नाही तर वेगळ्या एका विशेष कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. हा फोटो त्या कार्यक्रमातील आहे. हा कार्यक्रम सैनिकांप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पोस्टमध्ये चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.

Title:तथ्य पडताळणीः मुलाच्या लग्नात नीता अंबानींनी फोटोसाठी केला सैनिकांचा वापर?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
