
जिहाद हा वादग्रस्त संकल्पनेविषयी सोशल मीडियावर ना ना प्रकारच्या गोष्टीत तुम्हाला पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळतील. यात भर म्हणून आता ‘नाई जिहाद’ या वेगळ्या प्रकाराबद्दल सध्या समाजमाध्यमांवर पोस्ट फिरत आहेत. यात दावा करण्यात आला आहे की, एड्सबाधित ब्लेडद्वारे हिंदु पुरुषांमध्ये एड्स पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुस्लिम न्हाव्यांना अटक केली. सोबत या दोघांचा फोटोसुद्धा शेयर केला जातोय. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये हिंदु बांधवांना सावधानतेचा इशारा देत लिहिले की, एका मौलवीने पोलिसांसमोर कबुली दिली की, मशिदींमध्ये ‘नाई जिहाद’साठी पैसे मिळतात. त्यानुसार हिंदु पुरुषांना एड्सबाधित ब्लेडद्वारे चीर मारली जाते. या ‘नाई जिहाद’ प्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यामुळे हिंदु बांधवांनो तुम्हाला शपथ आहे की, दाढी-कटिंग केवळ हिंदु न्हाव्याकडेच करा.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर नवभारत टाईम्समधील एक लेख आढळला. यातील माहितीनुसार, या फोटोत दिसणाऱ्या दोघांना नाई जिहादासाठी नाही तर, चोरी आणि फसवणूकीच्या गुन्हात अटक करण्यात आले होते. यामध्य स्पष्ट म्हटले आहे की, नाई जिहादशी या दोघांचा काही संबंध नाही.

मूळ पोस्ट येथे वाचा – नवभारत टाईम्स
पोस्टमधील फोटोत इंडिया टीव्ही चॅनेलचा लोगो दिसतो. वरील माहिती आणि हा धागा पकडून शोध घेतला असता, गुगलने खालील रिझल्ट समोर आणले. इंडिया टीव्ही चॅनेलने 18 जुलै 2013 रोजी प्रसारित केलेल्या बातमीनुसार, सहा वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी भोजपूरी अभिनेता इरफान खान याला क्रेडिट कार्डच्या चोरीप्रकरणी अटक केली होती.

या बातमीच्या व्हिडियोनुसार, हिरव्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्तीचे नाव इरफान खान आहे. तो भोजपूरी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याच्यासोबत संजय यादव नावाचा मुलगा आहे. मुंबई पोलिसांना या दोघांना क्रेडिट कार्ड, चेक बुक आणि बिल बुक चोरी प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने, 30 क्रेडिट कार्ड आणि 15 चेक बुक ताब्यात घेण्यात आले.
इरफान भोजपूरी चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करायचा. तसेच क्रेडिट कार्ड आणि चेक बुक चोरून त्याद्वार लाखोंची खरेदी करायचा. अंबोली येथील एका व्यापाऱ्याने क्रेडिट कार्ड चोरी गेल्याची तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. या दोघांना बिहारच्या छपरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. इंडिया टुडेचा रिपोर्ट तुम्ही खाली पाहू शकता.
वांद्रे (बांद्रा) पोलिसांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, इरफान आणि संजयचा नाई जिहादशी काही संबंध नसून, हा दावा चुकीचा आहे.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, पोस्टमधील फोटोत दिसणाऱ्या दोघा जणांचा ‘नाई जिहाद’ प्रकारणाशी काही संबंध नाही. इरफान आणि संजयला 6 वर्षांपूर्वी पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केले होते. त्यांचा फोटो वापरून चुकीची संदेश पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:FAKE: या दोघांना ‘नाई जिहाद’ प्रकरणी अटक करण्यात आली नव्हती. वाचा सत्य काय आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
