
कोरोना व्हायरसने बाधित सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून आतापर्यंत हा आकडा शंभरीपार गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक ऑडियो क्लिप खूप व्हायरल होत आहे. यामध्ये नागपूरमध्ये 59 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या क्लिपमुळे सध्या नागपूर शहरात भीती व्यक्त केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता हा दावा चुकीचा असल्याचे आढळले.
काय आहे क्लिपमध्ये?
सुमारे चार मिनिटांची ही टेलिफोन संभाषणाची ऑडियो क्लिप आहे. यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला सांगतो की, नागपुरमध्ये 59 कोरोना पॉझिटिव्ह तर 200 पेक्षा जास्त संशयित रुग्ण आहेत. तसेच एका डॉक्टरला लागण झाली असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. या डॉक्टरची शहरात तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले; पण मुंबईला नमुने पाठविले असता त्याला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. लोकांपासून आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला. ही क्लिप तुम्ही खाली ऐकू शकता.
तथ्य पडताळणी
नागपूरविषयक या क्लिपमध्ये किती तथ्य आहे याचा शोध घेतला असता टाईम्स ऑफ इंडियाची एक बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी ही ऑडियो क्लिप खोटी असल्याचे सांगितले आहे. ही क्लिप शेयर करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार येणार, अशी त्यांनी घोषणादेखील केली.
ते म्हणाले, “अशी निराधार आणि तद्दन खोटी माहिती पसरविणे गुन्हा आहे. यासाठी विविध कायद्यांतर्गत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात प्रशासन गंभीर कारवाई करणार आहे. लोकांनीदेखील अशा खोट्या आणि अनाधिकृत माहिती/पोस्टवर विश्वास ठेवू नये.”
मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील ही क्लिप खोटी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “शहरातील डॉक्टर्स दिवसरात्र एक करून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शंका घेणे योग्य नाही. अशा अफवा शेयर करण्यापूर्वी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. केवळ सरकारी यंत्रणेकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. नागपूर महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनदेखील कोरोनासंदर्भाती इत्थंभूत व अद्यायावत माहिती देण्यात येते.”
मूळ बातमी येथे वाचा – नागपूर टुडे
नागपूर येथे केवळ 4 नागरिक करोना बाधित असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये एकही पॉजिटिव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आहेत. नागपूर विभागासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणांहून कोरोना चाचणी करण्यासाठी येत आहेत, राज्यातील सर्वात अद्ययावत अशी प्रयोगशाळा आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथे ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे समाज माध्यमात अशा प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण दूषित करणाऱ्यांचा सायबर सेलमार्फत शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
फॅक्ट क्रेसेंडोने नागपूरचे उपायुक्त सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या क्लिपमधील दावे पूर्णतः खोटे असल्याचे सांगितले. “क्लिपद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सायबर सेल याचा तपास करीत आहे. लोकांनी अशा फेक गोष्टींवर विश्वास ठेवू नये,” असे त्यांनी सांगितले.
निष्कर्षः
यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हायरल ऑडियो क्लिपमधील दावे खोटे आहेत. नागपूरमध्ये केवळ 4 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. क्लिपद्वारे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Title:नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसंबंधी फेक ऑडियो क्लिप व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
