सोशल मीडियावरील पोस्टनुसार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये भारतविरोधी नारेबाजी करण्यात आल्यामुळे हरिओम नावाच्या तरुणाने राहुल गांधी यांच्यावर बूट भिरकावला. संधी मिळाली तर तो पुन्हा असे करेल असेही म्हटले आहे. ही फेसबुक पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

राहुल गांधी यांना बूट फेकून मारणाऱ्या हरिओमने सांगितले की, काँग्रेसच्या रॅलीमध्ये “हिंदुस्थान मुर्दाबाद” असे नारे लावले जात होते. म्हणून मी त्यांच्यावर बूट भिरकावला. सैनिक सीमेवर शहीद होत असताना राहुल गांधी रॅली काढून स्वतःची कौतुक करून घेत होते. हे मला सहन झाले नाही. पोस्टमध्ये पोलिसांनी पकडलेल्या एक तरुणाचा फोटोदेखील दिला आहे.

तथ्य पडताळणी

गुगलवर राहुल गांधी यांच्यावर कधी बूट भिरकावण्यात आला होता याचा विविध कीवर्डस टाकून शोध घेतला. त्यातून या संदर्भात अनेक बातम्या समोर आल्या. नवभारत टाईम्सनुसार, 26 सप्टेंबर 2016 उत्तरप्रदेशमधील सीतापूर येथे राहुल गांधी यांची किसान यात्रा रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान हरिओम मिश्रा नावाच्या एका युवकाने राहुल गांधी यांच्या दिशेने बूट फेकून मारला होता. तो राहुल यांना लागला नाही. राहुल गांधी यांनी यात्रेचा फोटो ट्विट केले होते. खाली हिरओमचा फोटो दिला आहे.

ANI वृत्तसंस्थेने या प्रसंगाचा व्हिडियो ट्विटरवर शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://twitter.com/ANINewsUP/status/780334062330191872

अर्काइव्ह

विविध दैनिकातील बातम्यांनुसार, 25 वर्षीय हरिओम उत्तरप्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो स्थानिक पत्रकारसुद्धा होता. तो राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर नाराज होता. बूट फेकल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो ओरडून सांगत होता की, 60 वर्षे देशात काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली नाही. आणि आज ते शेतकऱ्यांसाठी यात्रा काढत आहेत. तिकडे देशाचे 18 जवान शहीद झालेले असताना राहुल गांधी यांना रोड शो काढायला विसरले नाही. शहीदांना नमन करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. केवळ मोदी सरकारवर टीका करण्यात आणि राजकीय रॅली काढण्यात ते व्यस्त आहेत. मात्र काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच गेले नाही. मी दुसऱ्यांदा बूट भिरकावणाऱ्यालासुद्धा मागेपुढे पाहणार नाही.

मूळ बातमी येथे वाचा – पंजाब केसरीअर्काइव्ह

फायनान्शियल एक्सप्रेसनेदेखील काँग्रेसवर नाराज असल्यामुळेच हरिओमने राहुल गांधी यांच्यावर बूट भिरकावला होता. काँग्रेसने सामान्य जनतेकडे आणि खासकरून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा त्याने आरोप केला होता. त्याने रॅलीमध्ये कुठेही देशद्रोही नारेबाजी लावल्याचे म्हटलेले नाही. पोलिसांनी हरिओमला अटक करून भारतीय दंड संहितेचे कलम 352, 354 व 500 नुसार गुन्हा दाखल केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – फायनान्शियल टाईम्स

हिंदुस्थान टाईम्सने हरिओमच्या कुटुंबाशी संवाद साधून बातमी केली होती. त्यामध्ये कुटुंबियांनी सांगितले की, उरी हल्ल्यानंतर हरिओम खूप नाराज होता. शहिदांच्या कुटुंबियांना 20 लाख नाही तर एक कोटी रुपये द्यायला हवेत असे तो म्हणायचा. सगळ्याच राजकीय पक्षांवर त्याचा रोष होता. राहुल गांधी यांचे दुर्दैव असे की, या काळात सीतापूर येथे त्यांची रॅली होती. त्यांच्याऐवजी दुसरा कोणताही राजकीय नेता असता तरी हरिओमने अशीच कृती केली असती.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

18 सप्टेंबर 2016 रोजी काश्मिरमधील उरी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 17 जवान शहीद झाले होते.

निष्कर्ष

स्वतः हरिओमचा जबाब आणि त्याचा कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आणि जवानांकडे दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून हरिओमने राहुल गांधींवर बूट भिरकावला होता. रॅलीमध्ये देशद्रोही नारेबाजी झाली म्हणून त्याने असे केले नाही. मूळात रॅलीमध्ये अशी नारेबाजी झालीच नव्हती. म्हणून ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: रॅलीमध्ये भारतविरोधी नारेबाजी झाल्यामुळे राहुल गांधींवर बूट भिरकावण्यात आला का?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False