
मला शेवटची संधी द्या मी सोलापूरचा विकास करतो, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 40 वर्षात विकास केला असता तर सोलापूरला विमानात आला असता. सिध्देश्वर एक्सप्रेसमधुन नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
मला शेवटची संधी द्या मी सोलापूरचा विकास करतो, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले का याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला दैनिक लोकसत्ताचे हे वृत्त दिसून आले. या वृत्तात सुशीलकुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले आहे. संधी हा शब्द त्यांनी वापरला नसून विकासावर त्यांनी कोणतेही भाष्य केल्याचे या वृत्तात दिसून येत नाही.
इन सोलापूर न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवरही याबाबतचे वृत्त आहे. या वृत्तात सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ पाहिजे, असे म्हटलेले आहे. विकासावर कोणतेही भाष्य केल्याचे या पोस्टमध्ये दिसून येत नाही.
दैनिक सकाळने दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले असून या वृत्तातही त्यांनी शेवटच्या निवडणुकीत पवार यांचा आर्शीवाद हवा आहे, असे म्हटलेले आहे. विकासावर ते बोलल्याचे या वृत्तात आढळत नाही.
त्यानंतर 7 एप्रिल रोजी झालेल्या सभेत मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी विकासाचे आश्वासन दिल्याचे आढळून येते.
निष्कर्ष
माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. वेगवेगळ्या सभेमध्ये त्यांनी विकासाचे आश्वासन दिले असून फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त सत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी : सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मला शेवटची संधी द्या मी सोलापूरचा विकास करतो
Fact Check By: Dattatray GholapResult: False
