
लोकसभेच्या रणधुमाळीत नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विविध फोटो सोशल मीडियावर फिरवले जातात. अशाच एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवी टोपी घालून पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्यासोबत जेवण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.
फेसबुक । अर्काइव्ह
युजरने या फोटोसोबत लिहिले की, भारतामध्ये काय खायचं, कुठले कपडे घालायचे यावर आपले पंतप्रधान ठरवतात; परंतु रात्रीमध्ये गुपचूप पाकिस्तानात जाऊन मोदी तुम्ही काय खाल्लं याचे उत्तर नागरिकांना द्या ? अनेकांनी या फोटोच्या सत्यतेबाबत शंका घेतली आहे.
तथ्य पडताळणी
नरेंद्र मोदी केवळ एकदाच (25 डिसेंबर 2015) पाकिस्तानला भेट दिली होती. तेव्हा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. ही भेट केवळ काही तासांची होती. मोदींनी त्यावेळी इम्रान खान यांची भेट घेतली नव्हती. याबाबत अधिक येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
मग हा फोटो आला कुठून?
यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर फेसबुक पोस्टशी साम्य असणारा एक फोटो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. उर्दू वायर नावाच्या वेबासाईटवरील या फोटोत इम्रान खान त्यांची त्यावेळीची पत्नी रेहम खान यांच्यासोबत सेहरचे भोजन करताना दिसतात.
ट्विटरवरदेखील हा फोटो उपलब्ध आहे. एका पाकिस्तान यूजरने 5 जुलै 2015 रोजी हा ट्विट केला होता. म्हणजे हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. ते ट्विट तुम्ही येथे पाहू शकता – ट्विटर । अर्काइव्ह
साजिदा बलोच नामक एका युजरने केलेल्या ट्विटमध्ये हा फोटो कराची येथील वावदा रेसिडेन्सीमधील असल्याचे म्हटले आहे. यावेळचे इतरही फोटो तिने शेयर केले आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.
आता फेसबुक पोस्टमधील फोटो आणि उर्दू वायर वेबसाईटवरील फोटो यांची तुलना करून पाहू.
यावरून हे सिद्ध होते की, रेहम खान यांच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो एडिट करून लावण्यात आला आहे. त्यामुळे हा फोटो खोटा आहे.
फोटोशॉप केलेल्या फोटोमध्ये मोदींचा खालील फोटो एडिट करून लावण्यात आलेला आहे.
निष्कर्ष
इम्रान खान व त्यांची पूर्व पत्नी रेहम खान यांचा 2015 मधील फोटो एडिट करून मोदी-इम्रान खान यांचा खोटा फोटा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:तथ्य पडताळणीः मोदींनी खरंच हिरवी टोपी घालून इम्रान खान सोबत जेवण केले का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
