तीन वर्षांपूर्वीचा फोटो राहुल गांधींच्या नागपूर सभेचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय | Political

राहुल गांधी यांनी 4 एप्रिल रोजी नागपूर येथे सभा घेतली. या सभेला गर्दी झाली की, नाही यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहेत. काँग्रेस समर्थक आणि विरोधक दोघे एकमेकांना खोटे ठरविण्यासाठी वेगवेगळे दावे करणारे फोटो शेयर करीत आहेत. त्यापैकी एक फोटो व्हायरल होत आहे. प्रचंड गर्दीचा हा फोटो राहुल गांधी यांच्या नागपूर सभेचा असल्याचा दावा केला जात आहे.

(फॅक्ट क्रेसेंडोच्या फॅक्ट चेकनंतर ही पोस्ट डिलिट करण्यात आली)

अर्काइव्ह

4 एप्रिल 2019 रोजी अपलोड केलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, राहुल गांधींच्या नागपूर येथील सभेला जमलेला जनसमुदाय ! कोणी विचार तरी केला होता कि महाराष्ट्रात मोदींपेक्षा राहुल गांधींच्या सभा इतक्या मोठ्या होतील. आतापर्यंत ही पोस्ट 9800 वेळा लाईक आणि 1200 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आलेली आहे. अनेकांनी हा फोटो खोटा असल्याचा आक्षेप घेतला. फॅक्ट क्रेसेंडोने मग याची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर 4 एप्रिल रोजीच्या सभेचे फोटो तपासले. तेव्हा या सभेचे फोटो त्यांनी ट्विट केले नसल्याचे समोर आले. तसेच काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरदेखील नागपूर सभेचे फोटो आढळले नाही.

पोस्टमधील फोटोचे निरीक्षण केल्यावर “Nagpur Today” असा वॉटरमार्क दिसतो. नागपूर टुडे हे वेबपोर्टल आहे. तेथे राहुल गांधीच्या सभेची बातमी तपासली. त्यानुसार, राहुल गांधी यांनी नागपुरच्या कस्तुरचंद पार्क येथे 4 एप्रिल रोजी सभा घेतली होती. नागपूर टुडेच्या या बातमीमध्ये व्हायरल होत असलेला फोटो दिलेला नाही. या बातमीत खालील फोटो दिला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – नागपूर टुडेअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग नागपूर टुडेचे व्यवस्थापकीय संपादक नीलभ कुमार यांच्याशी संपर्क साधून व्हायरल पोस्टमधील फोटोची सत्यता विचारली. कुमार यांनी स्पष्ट सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो 4 एप्रिलच्या सभेचा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे. राहुल गांधी यांनी 11 एप्रिल 2016 रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त “संविधान रॅली” आयोजित केली होती. या सभेचा तो फोटो आहे.”

या सभेच्या बातमीची त्यांनी लिंक पाठवली. Sonia, Rahul Gandhi paint Nagpur in Congress color; attacks RSS in its fort अशा मथळ्याच्या बातमीत चौथ्या क्रमांकावर खालील फोटो दिलेला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – नागपूर टुडेअर्काइव्ह

नागपूर टुडेवरील तीन वर्षांपूर्वीचा फोटो आणि यावर्षीचा फोटो यावरील वॉटर मार्कदेखील वेगवेगळ्या स्टाईलचा आहे. म्हणजेच हा जूना फोटो गुरुवारच्या सभेला जमलेली गर्दी म्हणून पसरविले जात आहेत.

संविधान रॅलीतील सभेची बातमी काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील दिलेली आहे. 11 एप्रिल 2016 रोजी झालेल्या या सभेचा व्हिडियो काँग्रेसच्या युट्यूब चॅनेलवरदेखील पाहू शकता.

तसेच 4 एप्रिल 2019 रोजीच्या सभेतील राहुल गांधीचे भाषण येथे पाहा-

निष्कर्ष

राहुल गांधींच्या 4 एप्रिलच्या सभेला जमलेली गर्दी म्हणून जो फोटो शेयर केला जात आहे तो तीन वर्षांपूर्वीच्या (11 एप्रिल 2016) संविधान रॅली कार्यक्रमातील आहे. हा फोटो ज्यांनी प्रसिद्ध केला, त्या नागपूर टुडे या वेबसाईटच्या व्यवस्थापकीय संपादकांनीदेखील हा फोटो तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तीन वर्षांपूर्वीचा फोटो राहुल गांधींच्या नागपूर सभेचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False