खरंच न्यूयॉर्क टाईम्स मॅगझीनने मोदींचे हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले? जाणून घ्या सत्य.

False राजकीय | Political

(Image Source: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय मीडिया यांच्या संबंधावर टिप्पणी करणारे एक व्यंगचित्र फेसबुकवर व्हायरल होत आहे. हे व्यंगचित्र अमेरिकेतील प्रतिष्ठित न्यूयॉर्क टाईम्स मॅगझिनने प्रसिद्ध केले असल्याचा दावा केला जात आहे. खाली दिलेल्या पोस्टमध्ये तुम्ही ते पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने या व्यंगचित्राची पडताळणी केली.

अर्काइव्ह

वरील पोस्टमधील व्यंगचित्रामध्ये भारतीय मीडिया पंतप्रधान मोदींना कसा बांधिल आहे, याविषयी व्यंग करण्यात आले आहे. सोबत असेही म्हटले की, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये भारतीय पत्रकारांची “खरी” प्रतिमा दर्शविणारे हे व्यंगचित्र आहे. अनेकांनी या व्यंगचित्राच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फॅक्ट क्रेसेंडोने व्यंगचित्राला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. यातून या व्यंगचित्राशी साम्य असणारे दुसरे व्यंगचित्र समोर आले.

त्या व्यंगचित्रालादेखील पुन्हा गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता अमेरिकेतील लॉस एंजेलिस टाईम्स दैनिकातील डेव्हिड हॉर्सि या कार्टूनिस्टचे नाव समोर आले. त्याने या दैनिकात काढलेले व्यंगचित्र तपासले असता 14 मे 2012 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत खालील व्यंगचित्र आढळले. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष मोठमोठ्या कंपन्यांसमोर कसे लोटांगण घालतो, याविषयी या व्यंगचित्राद्वारे टीका करण्यात आली आहे.

मूळ व्यंगचित्र तुम्ही येथे पाहू शकता – लॉस एंजेलिस टाईम्सअर्काइव्ह

फेसबुक पोस्टमधील व्यंगचित्र आणि लॉस एंजेलिस टाईम्स या दैनिकातील व्यंगचित्र यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होते की, सात वर्षांपूर्वीच्या मूळ व्यंगचित्रामध्ये बदल करून त्यामध्ये मोदींचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच हे व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्स मॅगझिनमधील नाही. रंजक बाब म्हणजे डेव्हिड हॉर्सि यांनी टाईम मॅगझिनच्या Are Your Mon Enough  या प्रसिद्ध कव्हरवरून हे व्यंगचित्र काढले होते.

मग मोदींचे व्यंगचित्र कोणी काढले?

हे व्यंगचित्र व्यवस्थित पाहिल्यास खाली डाव्याबाजूच्या कोपऱ्यामध्ये व्यंगचित्र काढणाऱ्या मूळ कलाकाराच्या नावाखाली @_MIteshPatel असे नाव दिसते. गुगलवर ते शोधले असता टाईम्स ऑफ इंडियातील 3 मार्च 2017 रोजीची एक बातमी समोर आली.

या बातमीनुसार, अहमदाबाद येथील मितेश पटेल नावाच्या एका व्यंगचित्रकाराविरोधात भाजपच्या कर्नाटक आयटी सेलने बेंगळुरूमध्ये तक्रार दिली होती. त्याने ट्विट केलेल्या “नॅशनलिझम” या कार्टूनवर आक्षेप घेण्यात आला होता.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

आम्ही मितेश पटेल (@_MIteshPatel) यांचे ते वादग्रस्त ट्विट शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (निलंबित) करण्यात आल्याचे आढळले.

निष्कर्ष

सदरील पोस्टमधील व्यंगचित्र हे न्यूयॉर्क टाईम्स मॅगझिनमधील नाही. लॉस एंजेलिस टाईम्समध्ये 2012 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ व्यंगचित्रामध्ये बदल करून त्यावर मोदींचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:खरंच न्यूयॉर्क टाईम्स मॅगझीनने मोदींचे हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले? जाणून घ्या सत्य.

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False