भारताला दसऱ्याच्या दिवशी बहुचर्चित पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विधिवत विमानाची पूजा करून विमानावर ओम काढले, नारळ ठेवले. एवढेच नाही तर राफेलच्या चाकाखाली दोन लिंबसुद्धा ठेवले. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. काहींनी ही प्रथा-परंपरा म्हणून याचे समर्थन केले तर, काहींनी अंधश्रद्धेला खतपाणी म्हणून विरोध केला.

या पार्श्वभूमीवर तेजस विमान ताफ्यात दाखल करते वेळीच्या सोहळ्याचा एक फोटो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. यामध्ये एक मौलवी विमानासमोर मुस्लिम प्रार्थना करताना दिसतो. हा फोटो काँग्रेस सरकारच्या काळातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. फेसबुकवर हा फोटो शेयर करून लिहिले की, कॉंगींचे सरकार असताना HAL कडून भारताला तेजस मिळाले तेव्हा केलेली पुजा. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्यता तपासली.

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 1 जुलै 2016 रोजी दोन तेजस विमाने हवाई दलात दाखल करण्यात आल्याच्या सोहळ्यातील आहे. बंगळुरूच्या 'एअरक्राफ्ट सिस्टीम टेस्टिंग एस्टाब्लिशमेंट' येथे 1 जुलै 2016 रोजी 'तेजस' विमाने हवाई दलात दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम झाला होता.

मूळ फोटो येथे पाहा – डेक्कन क्रोनिकलअर्काइव्ह

डेक्कन क्रोनिकल वेबसाईटवर सदरील फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, या कार्यक्रमात सर्व-धर्म पूजा करण्यात आली होती. नवे विमान ताफ्यात दाखल करतेवेळी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या आधी अशा प्रकारची प्रार्थना-पूजा करण्याची परंपरा असल्याची माहिती एएनआयने दिली.

‘द हिंदु’च्या बातमीनुसार, तेजस विमाने हवाई दलात दाखल करते वेळी हिंदु, शीख, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मातील रितीरिवाजांनुसार प्रार्थना व पूजा करण्यात आली. त्यानंतर नारळ फोडून वरिष्ठ एचएएल अधिकाऱ्यांनी या विमानांची कागदपत्रे हवाई दलाकडे सुपूर्द केली. या विमानांचे ‘फ्लाईंग डॅगर्स’ असे नामकरण करण्यात आले.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदुअर्काइव्ह

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत सर्वधर्म पूजा कोणी केली याची माहिती देण्यात आली आहे. ज्युनियर वॉरंट अधिकारी के. के. तिवारी, नाईक सुभेदार करनाल सिंग आणि ज्युनियर वॉरंट अधिकारी मोहम्मद मुश्ताक अली यांनी आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना केली. येथून जवळील चर्चमधून पीटर राजबोन आणि कार्थी कुमार यांना बोलवण्यात आले होते. तिवारी यांनी गणेशाला वंदन करीत कलश पूजा आणि गायत्री मंत्राचा जप केला. त्यानंतर अली यांनी कुराण, करनाल यांनी गुरू ग्रंथ साहिब आणि राजबोन यांनी बायबलमधील प्रार्थना वाचली.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह

एएनआयने 1 जुलै 2016 रोजी ट्विट करून यावेळी करण्यात आलेल्या पूजेचे फोटो शेयर केले होते. सोबत लिहिले की, हवाई दलात तेजस लढाऊ विमान दाखल करण्याचा कार्यक्रमात विविध धर्मांच्या प्रार्थना करण्यात आल्या. या कर्यक्रमाचा व्हिडियोदेखील एएनआयने युट्यूबवर अपलोड केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=w8u1ujM5CSg

संपूर्ण भारतीय बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ तेजस विमान सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनीने (HAL) तयार केले आहे. रशियन बनावटीच्या मिग-21 या विमानांना पर्याय म्हणून लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) बनवण्याचा प्रकल्प 1983 साली हाती घेण्यात आला होता. मात्र अनेक कारणांनी ही विमाने प्रत्यक्ष हवाईदलात सामील होण्यास विलंब झाला. तत्कालिन संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी डिसेंबर 2013 मध्ये तेजस विमान सेवेत दाखल होण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार, तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी जानेवारी 2015 मध्ये ‘तेजस’ची कागदपत्रे हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांच्या स्वाधीन केली. (संदर्भ- लोकसत्ता)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करून एचएएल आणि एडीए यांचे अभिनंदन केले होते.

https://twitter.com/narendramodi/status/748780328219619328?lang=en

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, तेजस विमानासमोर मुस्लिम प्रार्थना करतानाचा फोटो काँग्रेसच्या काळातील नाही. हा फोटो 1 जुलै 2016 रोजी दोन तेजस विमाने हवाई दलात दाखल करतेवेळी करण्यात आलेल्या प्रार्थनेचा आहे. यावेळी हिंदु, शीख, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मातील रितीरिवाजांनुसार प्रार्थना व पूजा करण्यात आली होती. तसेच, यावेळी भाजपचे सरकार होते. म्हणून पोस्टमधील दावा खोटा ठरतो.

Avatar

Title:मुस्लिम प्रार्थना करून ‘तेजस' विमान ताफ्यात दाखल केल्याचा फोटो काँग्रेसच्या काळातला नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False