
राज्यातील गरीब व गरजू लोकांना केवळ 10 रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या ‘शिवभोजन’ योजनेला येत्या प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे गोरगरिबांना दहा रुपायांमध्ये पोटभर जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
‘शिवभोजना’ची चव चाखण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. ‘शिवथाळी’ घेण्यासाठी ग्राहकांना आपले आधारकार्ड सादर करावे लागेल. लाभार्थ्याचा चेहरा आणि आधारकार्डावरील फोटो जुळला, तरच थाळी मिळणार आहे, असे मेसेज फिरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
इंटरनेटवर यासंबंधी माहिती घेतल्यावर काही वृत्तस्थळांनी ‘शिवभोजना’साठी आधारकार्ड गरजेचे असल्याचे म्हटले. परंतु, ही बातमी देताना कोणत्याही सुत्रांकडून ही माहिती मिळाली हे दिलेले नाही. त्यामुळे माहितीच्या सत्यतेबाबत शंका निर्माण होते.
‘शिवभोजन’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत याची माहिती योजनेच्या शासन निर्णयात दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. त्यामध्ये कुठेही जेवण घेण्यासाठी आधारकार्ड गरजेचे म्हटलेले नाही. अशी कोणतीही अट त्यामध्ये नाही. मूळ आदेश तुम्ही येथे वाचू शकता – शासन निर्णय । अर्काइव्ह
सोशल मीडियावर आधारकार्ड सक्तीची बातमी व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. ज्यांच्या खात्याअंतर्गत ही योजना सुरू केली जाणार आहे ते अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ‘शिवभोजन’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले.
काय आहे शिवभोजन योजना?
गरिबांना पोटभर अन्न मिळावे, या हेतूने ही योजना सुरू करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयात मिळेल. दुपारी 12 तो दोन या वेळत हे जेवण मिळेल. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येईल.
निष्कर्ष
‘शिवभोजना’साठी महाराष्ट्र सरकारने आधारकार्डची सक्ती केली नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्यादेखील एखाद्या व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर तो फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवा.

Title:FACT CHECK: ‘शिवथाळी’साठी आधारकार्ड सक्तीचे आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
