
पेट्रोलचे भाव शंभरीनजीक गेले असताना इंधन दरवाढीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीच्या गॅस्ट स्टेशनचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने ‘इंडियन ऑईल’ कंपनी आता अडाणी ग्रुपला विकली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या फोटोवरून संदर्भहीन माहिती शेअर केली जात आहे.
काय आहे दावा?
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
फेसबुकवर हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीची माहिती घेतली. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यावर कळाले की, भारत सरकारची कंपनी ‘इंडियन ऑईल’ आणि अडाणी ग्रुपच्या ‘अडाणी गॅस’ कंपनीची ही संयुक्त कंपनी (IOAGPL) आहे.
देशभरात विविध शहरांमध्ये गॅस वितरणाचे जाळे पसरविण्याच्या उद्देशाने इंडियन ऑईल आणि अडाणी ग्रुप यांच्यामध्ये संयुक्त करार करण्यात आला होता.
सध्या व्हायरल होत असलेला फोटो IOAGPL कंपनीच्या एका सीएनजी आऊटलेटचा आहे.
मूळ वेबसाईट – IOAGPL
इंडियन ऑईलसोबत असा संयुक्त करार करणारी अडाणी गॅस ही एकमेव कंपनी आहे का?
नाही. इंडियन ऑईलने विविध कंपन्यांसोबत विविध उद्देशांसाठी अनेक संयुक्त कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. केवळ अडाणी ग्रुपसोबत नाही.
उदाहरणार्थ, दिल्ली विमानतळावर हवाई इंधनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने दिल्ली विमानतळ व भारत पेट्रोलियमसोबत मिळून ‘दिल्ली एव्हिएशन फ्युएल फॅसिलीट’ नावाची कंपनी सुरू केलेली आहे. खास प्रकारचे ल्युब्रिकंट्सच्या उत्पादनासाठी NYCO आणि बाल्मर लॉव्हरी कंपनीशी संयुक्त करार करण्यात आला होता.
अशाच प्रकारे गॅस वितरणासाठी अडाण गॅस कंपनीशी संयुक्त उपक्रम हाती घेतलेला आहे.
मूळ वेबसाईट – इंडियन ऑईल
मग अडाणी ग्रुपसोबत हा करार नरेंद्र मोदी सरकारच्या काळात करण्यात आला का?
इंडियन ऑईल-अडाणी गॅस (IOAGPL) ही कंपनी 4 ऑक्टोबर 2013 रोजी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. दोन्ही कंपन्यांची या संयुक्त कंपनीमध्ये 50-50 टक्के भागीदारी होती.
हेदेखील वाचा:
‘सरदार वल्लभभाई पटेल’ विमानतळाला आता अडाणी समूहाचे नाव देण्यात आले का?
‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडीच्या व्हिडिओचे सत्य काय?
नरेंद्र मोदी यांनी गौतम अडाणी यांच्या पत्नीसमोर झुकून नमस्कार केला का?
सोशल मीडियावर सदरील फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधला. सोशल मीडियावरील दावे फेटाळत त्यांनी सांगितले की, “इंडियन ऑईल-अडाणी गॅस ही एक संयुक्त कंपनी (Joint Venture) आहे. त्यामुळे अडाणी ग्रुपने इंडियन ऑईलला विकत घेतले असे म्हणणे चुकीचे आहे. गेल्या सात वर्षांपासून ही कंपनी अस्तित्वात आहे. दोन्ही कंपन्या स्वतंत्र असून, व्हायरल होत असलेला फोटो आमच्या संयुक्त कंपनीच्या गॅस स्टेशनचा आहे.”
सोशल मीडियावर हा दावा व्हायरल झाल्यावर केंद्रीय पत्र व सूचना मंत्रालयाने ट्विटरवर याबाबत खुलासा केला. इंडियन ऑईल कंपनी एका खासगी समुहाला विकल्याच्या दावा असत्य आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, भारत सरकारने इंडियन ऑईल ही कंपनी अडाणी ग्रुपला विकलेली नाही. देशात गॅस वितरण करण्याच्या उद्देशाने इंडियन ऑईल-अडाणी गॅस ही एक संयुक्त कंपनी 2013 साली स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर केले जाणारे असत्य आहेत.
[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आप

Title:अडाणी ग्रुपने ‘इंडियन ऑईल’ कंपनी विकत घेतली का? वाचा ‘त्या’ फोटोमागील सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
