IMPORTANT: मतदान केंद्रात आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो का?

False सामाजिक

सध्या मतदान करतानाचे व्हिडियो आणि फोटो व्हॉटस्अ‍ॅप-फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडू शकतो की, आपण मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ शकतो का? सध्या व्हायरल होत असलेल्या एका मेसेजनुसार, “मतदार स्वत:चा मोबाईल फोन मतदान करताना जवळ बाळगू शकतो.” खरंच असे का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

प्रबोधन मंच नावाच्या फेसबुक पेजवरील पोस्टमधील मजकुर खालीलप्रमाणे आहे-

“मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्याला निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे” अशा पद्धतीची अफवा काहीजण पसरवत आहेत. निवडणूक आयोगाने बंदीचा असा कोणताही आदेश दिलेला नाही.

मतदार स्वत:चा मोबाईल फोन मतदान करताना जवळ बाळगू शकतो.

मोबाईल फोनचा वापर बोलणे, फोटो काढणे, रेकॉर्ड करणे इ. साठी करू नये. फोन जवळ ठेवायला हरकत नाही. अफवांपासून दूर रहा. देशाच्या हितासाठी १००% मतदान करा.

तथ्य पडताळणी

गुगलवर यासंबंधीचा शोध घेतला असता अनेक बातम्या समोर येतात. इंडिया टुडेने 18 एप्रिल रोजी केलेल्या बातमीनुसार, कर्नाटकात मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तेथील मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान केंद्रात स्मार्टफोन किंवा कॅमेरा नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात सेलफोन बाळगण्यास परवानगी नाही. त्यामुळे मतदारांनी एक तर फोन घरीच ठेवावा किंवा पोलिसांकडे तो देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश करावा.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

त्यामुळे आम्ही आदर्श आचारसंहितेचे नियम तपासले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आचारसंहितेबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ – 2014) मराठीतून उत्तरे दिली आहेत. त्यातील 93 क्रमांकाचा प्रश्न मतदान केंद्रात मोबाईल वापराविषयी आहे. त्याच्या उत्तरात स्पष्ट म्हटले आहे की, मतदान केंद्राच्या 100 मीटर परीघात मोबाईल बाळगण्यास किंवा वापरण्यास मुभा (परवानगी) नाही.

केवळ निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मोबाईल बाळगण्यास परवानगी असून, त्यांना फोन सायलेंट मोडवर ठेवणे बंधनकारक आह.

मूळ मजकूर येथे वाचा – आचारसंहिता नियम (मराठी)आचारसंहिता नियम (इंग्रजी)

निवडणूक आयोगद्वारे पीठासीन अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. सर्वात अलीकडे (Latest) प्रकाशित झालेल्या पुस्तिकेमध्येसुद्धा मतदान केंद्रात (Polling Booth/Station) मोबाईल वापराविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यात म्हटले की, आयोगाच्या स्थायी आदेशानुसार मतदान केंद्रात व आसपासच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन आणण्यास परवानगी नाही. म्हणजे आयोगाने मोबाईल वापरावर खूप ठळक आणि स्पष्ट नियम तयार केले आहेत.

पीठासीन अधिकाऱ्यांची पुस्तिका येथे वाचा – पुस्तिका (इंग्रजी)पुस्तिका (हिंदी)

मतदारांना दिल्या जाणाऱ्या ‘व्होटर स्लिप’वर पाठीमागील बाजूस मतदानकर्त्यासाठी पाच सूचना दिलेल्या असतात. त्याचे छायाचित्र तुम्ही खाली पाहू शकता. पैकी तिसऱ्या क्रमांकावर स्पष्ट सूचना आहे की, मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणि कॅमेरासारख्या गॅझेटना (यंत्र) परवानगी नाही. त्यामुळे मतदान केंद्रात मोबाईल नेऊ नये.

विशेष म्हणजे मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास 2008 पासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु, तेव्हा आजसारखे इंटरनेट कनेक्शन असणारे स्मार्टफोन आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसे.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 128 नुसार मतदान गुप्त राखणे बंधनकारक आहे. ही गुप्तता न राखणाऱ्या मतदारास मतदान करण्यापासून वंचित ठेवल्या जाऊ शकते. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मतदाना करतानाचे फोटो/व्हिडियो काढणे निषिद्ध आहे.

मूळ दस्तऐवज येथे वाचा – मतदार माहिती पुस्तिका

निष्कर्ष

निवडणूक आयोगाची नियमावली तपासल्यावर असे सिद्ध होते की, मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनचा वापर बोलणे, फोटो काढणे, रेकॉर्ड यासाठी करण्यावर तर बंदीच आहे, त्याचबरोबर तो जवळ ठेवायलासुद्धा परवानगी नाही. मतदान केंद्र व शंभर मीटर परिसरात मतदार मोबाईल फोन बाळगण्यास मनाई आहे. त्यामुळे फेसबुकवरील व्हायरल मेसेज असत्य आहे.

Avatar

Title:IMPORTANT: मतदान केंद्रात आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False