आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले असा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. त्यांनी ईसाई (ख्रिश्चन) धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी इसाई धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. घर वापसी, मुळ धर्मात परत… स्वागत असे या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. या पोस्टमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा एक फोटो दाखविण्यात आला आहे. या फोटोमध्ये स्वामी स्वरुपानंद आणि जगन मोहन रेड्डी हे नदीमध्ये ओल्या वस्त्राच्या अंगाने उभे असून, त्यांच्यासोबत काही हिंदू लोक आहेत.

या पोस्टबद्दल सत्य शोधण्यासाठी आम्ही गुगलवर सर्वात प्रथम जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले का? असे  सर्च केले. त्यानंतर पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या फोटोला रिव्हर्स इमेज करुन सर्च केले.

जगन मोहन रेड्डी यांनी 10 ऑगस्ट 2016 मध्ये ऋषीकेश येथे स्वामी स्वरुपानंद यांच्यासोबत गंगा नदीची हिंदू पद्धतीने पुजा केली. त्याचवेळी त्यांनी आंध्रप्रदेशाच्या विकासासाठी, आंध्र प्रदेश जनतेच्या कल्याणासाठी आणि आंध्र प्रदेश राज्याला विशेष श्रेणीतील राज्याचा दर्जा मिळावा म्हणून गंगा नदीकिनारी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या सोबत स्वामी स्वरुपानंद आणि त्यांचा शिष्य समुदाय उपस्थित होता.

या संदर्भातील व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. युट्युबवर साक्षी टीव्ही या चॅनलवर हा व्हिडिओ 10 ऑगस्ट 2016 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये 6.16 मिनिटांवर व्हिडिओतील दृष्य आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हे दोन्हीही दृष्य सारखेच असल्याचे आपणास आढळते.

ऋषीकेश येथे गंगा नदी पुजन केल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी ऋषीकेशमधील संत मंडळींसाठी विशेष भोजन व्यवस्था केली होती. याविषयीची संपुर्ण बातमी त्यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली आहे. या कार्यक्रमाची माहिती वायएसआर काँग्रेस या राजकीय पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील आपल्याला दिसून येते.

YSR काँग्रेस Website l अर्काईव्ह

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी इंडिया टुडे या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मी इसाई धर्मातील प्रार्थनेवर विश्वास करतो, मी बायबल वाचतो आणि प्रभु येशू आणि इसाई धर्माची प्रार्थना करतो असे त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल माहिती सांगितली आहे. हा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता.

निष्कर्ष :  सर्व संशोधनानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी कोणत्याही प्रकारचे धर्मांतर केले नसून, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा ऑगस्ट 2016 मधील आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले हा पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False