राहुल गांधींनी फेसबुक-इंस्टग्राम वापरणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Altered राजकीय | Political

निवडणुकीच्या प्रचारत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते वेगवेगळी आश्वासने देत असतात. अशाच एका प्रकारामध्ये राहुल गांधी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. सोबत पुरावा म्हणून त्यांच्या भाषणाची एक क्लिपदेखील व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. युवकांना कौशल्याविकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत बोलत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिपमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “आपले जे युवा रस्यावर फिरतात किंवा इंस्टाग्राम-फेसबुक वापरतात त्यांच्या खात्यावर वर्षीक एक लाख रुपये म्हणजे दरमहा आठ हजार पाचशे रुपये आमचे सरकार जमा करेल.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “सर्व फेसबुक इंस्टाग्राम चालवनाऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये टाकतो – राहुल गांधी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप राहुल गांधीनी 20 एप्रिल रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये घेतलेल्या सभेतील भाषणाची आहे.

राहुल गांधी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हायरल होत असलेले विधान आपण 12:40 मिनिटापासून पाहू शकता.

11 व्या मिनिटापासून राहुल गांधी युवकांच्या नोकरी संबंधित बोलताना म्हणतात की, “भारतातील सर्व पदवीधर आणि उच्च शिक्षित युवकांना ‘पहिली नोकरी पक्की’ योजनेतून पहिल्यावर्षी अप्रेंटिसशिप (शिक्षणासंबंधित व्यव्हारीक ज्ञान देणारी ट्रेनिंग) दिली जाईल. या प्रशिक्षण कालावधीमध्ये युवकांच्या खत्यात वर्षाला एक लाख रुपये म्हणजे दर महिन्याला 8500 रुपये जमा करण्यात येईल.”

पुढे ते सांगतात की, “युवकांना एका वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांच्या योग्यतेनुसार खासगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रात नोकरी दिली जाईल. जे युवक आज रस्यावर फिरतात आणि इंस्टाग्राम-फेसबुक बघतात त्यांना या अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून वार्षिक एक लाख रुपये  त्याच्या खात्यात जमा होईल.”

हे वक्तव्य येथे पाहू शकता.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केलेली नाही. मूळ भाषणात ते युवकांना अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून रोजगार देण्याबाबत बोलत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींनी फेसबुक-इंस्टग्राम वापरणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered