
चांगली बातमी ! कोरोना विषाणूची लस तयार आहे. इंजेक्शन नंतर 3 तासांच्या आत रुग्णाला बरे करण्यास सक्षम. यूएस वैज्ञानिकांना सलाम. आत्ताच ट्रम्प यांनी घोषित केले की रोश मेडिकल कंपनी पुढच्या रविवारी ही लस सुरू करेल आणि त्यातून लाखो डोस सज्ज आहेत, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कोरोना विषाणूची लस खरोखरच तयार आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

याच दाव्यासह एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात येत असल्याचेही आम्हाला दिसून आला.
तथ्य पडताळणी
कोरोना विषाणूची लस खरोखरच तयार झाली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज करुन पाहिले. त्यावेळी आम्हाला Gulte या संकेतस्थळावरील 22 मार्च 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, दक्षिण कोरियातील औषध निर्माण करणारी कंपनी सुजेनटेकने कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची चाचणी करण्याकरिता एक किट विकसित केले आहे. या किटद्वारे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे केवळ दहा मिनिटात समजू शकते. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रावर देखील आपण या औषध निर्माण करणाऱ्या सुजेनटेक कंपनीचे नाव पाहू शकता.

त्यानंतर द गार्डियन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 17 मार्च 2020 रोजी प्रसिध्द केलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कीटद्वारे सध्या ऑस्ट्रेलियात कोणतीही चाचणी घेण्यात येत नाही.
कोरोनाची लस उपलब्ध आहे का?
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर संशोधन करत असून त्यावर लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांनी या विषाणूचा अनुवांशिक क्रम ऑनलाइन जाहीर केलेला आहे. माध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तानुसार या प्रक्रियेसाठी काही कालावधी लागेल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसबद्दल कोणत्याही विशेष औषधाची शिफारस आजपर्यंत करण्यात आलेली नाही. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची काळजी घेत तिच्या लक्षणांवर सध्या उपचार करण्यात येतात. काही विशिष्ट उपचारांवर सध्या संशोधन आणि त्याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या सुरु आहेत. या विषाणूवर कोणतीही प्रतिजैवके (अँटीबायोटिक्स) प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले आहे.


त्यानंतर लस शोधल्याचा दावा करणारा एनबीसी न्यूज या वाहिनीचा व्हिडीओ देखील शोधला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 मार्च 2020 रोजी तेथे आणीबाणी घोषित केली. त्यावेळी त्यांनी यावर काय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती दिली. रोश डायग्नोस्टिक कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट सोस यांनी कंपनी याबाबतच्या चाचणी घेण्यासाठी काय उपाययोजना करत आहे याची माहिती दिली. खालील व्हिडिओत ते आपण 19 व्या मिनिटापासून 19 मिनिटे 36 सेकंदापर्यंत पाहू शकता. त्यांनी लस शोधल्याचा कोणताही दावा याठिकाणी केलेला दिसत नाही.
यातून हा लस शोधल्याचे जाहीर करतानाचा व्हिडिओ असल्याचा दावाही असत्य असल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष
तीन तासात कोरोना विषाणूवर इलाज करणारी कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही. लसचे म्हणून पसरविण्यात येत असलेले छायाचित्र हे दक्षिण कोरियातील कोरोनाची चाचणी करणाऱ्या कीटचे आहे.
