
छातीत बाण घुसलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेयर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काही मुस्लिम मौलवी आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्ती घुसून नमाज अदा करत असल्यामुळे आदिवासींनी त्यांच्यावर बाणांनी हल्ला केला. या फोटोवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
5 जून रोजीच्या पोस्टमध्ये छातीत बाण घुसलेला एका व्यक्तीचा फोटो आहे. काही लोक त्याला उचलून घेऊन जाताना दिसतात. पोस्टमध्ये म्हटले की, हा फोटो किशनगंज येथील आहे. तेथे काही मौलवी खुल्या जागेवर नमाज अदा करीत होते. ही जागा आदिवासींच्या मालकीची होती. त्यामुळे आदिवासींनी त्यांना तेथे नमाज अदा करण्यास मनाई केली. परंतु, मौलवींनी त्यांचे काही ऐकले नाही. म्हणून आदिवासींनी त्यांच्यावर बाणांनी हल्ला चढविला.
तथ्य पडताळणी
गुगलवर जेव्हा आम्ही किशनगंज आदिवासी हत्या असे सर्च केले. तेव्हा लाईव्ह हिंदुस्तान वेबसाईटवर पोस्टमधील फोटो आढळला. बातमीमधील माहितीनुसार, हा फोटो बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील धुलाबाडी गावातील आहे. तेथे चहामळा मालक आणि आदिवासी यांच्यामधील जागेच्या वादाचे पर्यावसन पाच जून रोजी हाणामारीत झाले. यावेळी आदिवासींनी बाणांनी हल्ला केला. यामध्ये सात जण जखमी झाले. एका युवकाच्या छातीतही बाण घुसला. यामुळे परिसरात कमालीचा तणाव पसरला होता.

मूळ बातमी येथे वाचा – लाईव्ह हिंदुस्तान । अर्काइव्ह
हल्ल्याचे कारण काय होते?
लाईव्ह हिंदुस्तान आणि लोकमत न्यूजच्या बातमीनुसार, मोहम्मद इम्तियाज यांच्या चहाच्या मळ्यात गेल्या दीड महिन्यांपासून गावातील आदिवासींनी अतिक्रमण केले होते. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. आदिवासींनी बुधवारी (पाच जून) मळ्यातील ईदगाहच्या जमिनीवर कब्जा करून लाल झेंडा लावून पूजा करण्यास सुरुवात केल्यावर मळ्याच्या मालकाने त्यांना हटकले. त्यामुळे आदिवासींनी बाण चालविले. यात एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आदिवासींनी पोलिसांवरसुद्धा हल्ला केला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या गाडीवरदेखील दगडफेक झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहुन पोलिसांनी तेथे ठाण मांडले.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत न्यूज । अर्काइव्ह
द हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, काही महिन्यांपूर्वी आदिवासींनी बळजबरी या चहाच्या मळ्यावर अतिक्रमण केले होते. रात्री मोठ्या संख्येने धारदार शस्त्र घेऊन हे आदिवासी मळ्यात घुसले आणि ठाण मांडले. जागेवरून मालक आणि आदिवासी यांच्यात वाद सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. म्हणजे पोस्टमध्ये दावा करण्यात आल्याप्रमाणे या घटनेमागे कोणतेही सांप्रदायिक कारण नव्हते.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्तान टाईम्स । अर्काइव्ह
ईटीव्ही भारतच्या युट्यूब चॅनेलवर नोव्हेंबर 2018 रोजी अपलोड केलेल्या व्हिडियोमध्ये आदिवासींनी किशनगंजमध्ये एका चळाच्या मळ्यात झोपडा टाकून कसे ठाण मांडले हे दाखविले आहे. ही समस्या अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे.
निष्कर्ष
किशनगंज जिल्ह्यात आदिवासांनी केलेल्या बाण हल्ल्यामागे सांप्रदायिक कारण नसून, जागेचा वाद हे कारण आहे. आदिवासींनी चहाच्या मळ्यात अतिक्रमण केल्याचा विरोध करणाऱ्या लोकांवर त्यांनी बुधवारी बाण हल्ला केला. त्यांनी नमाज पढणाऱ्या मौलवींवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:आदिवासींच्या जमिनीवर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांवर बाणांनी हल्ला करण्यात आला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
