
अहमदाबाद विमानतळावर युगांडाचा राजा, त्याची वेशभूषाही आश्चर्यकारक आहे, अशी माहिती देत मदन जैन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही व्यक्ती युगांडाचे राजा आहे का, युगांडात आजही राजेशाही आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
हे खरोखरच युगांडाचे राजे आहेत का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी युगांडात लोकशाही असल्याचे आम्हाला परिणामात दिसून आले. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे त्यावेळी घाना या देशातील लोक अशी वेशभुषा करत असल्याचे दिसून आले. आपण घाना या देशातील नागरिकांच्या वेशभुषेचे एक छायाचित्र खाली पाहू शकता.
युगांडात राजेशाही नाही आणि लोकशाही आहे मग ही व्यक्ती कोण, असा प्रश्न कायम असल्याने स्क्रीन शॉट घेत आम्ही गुगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्स रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने शोध घेतला. त्यावेळी आम्हाला अनेक परिणाम प्राप्त झाले. या परिणामाद्वारे मात्र आम्हाला अपेक्षित अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. युगांडातील राजाने जर अहमदाबादमध्ये भेट दिली असेल तर त्याची माहिती गुजरात सरकारकडे निश्चितच असेल म्हणून फॅक्ट क्रेसेंडोने गुजरात सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. युगांडाचा राजा, घानाचा कोणताही अधिकारी यांनी अहमदाबादला अथवा गुजरातला भेट दिली नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रकारची कोणतीही अधिकृत भेट झाली नसल्याचे गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यातून ही बाब पुरेशी स्पष्ट झाली की, ही व्यक्ती युगांडाचा राजा नसून घाना कोणीतरी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. एखादा देशातील राजा अथवा उच्चपदस्थ व्यक्ती अन्य कोणत्याही देशात जात असेल तर आंतरराष्ट्रीय संकेतानुसार त्या व्यक्तीच्या प्रवासाचा कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव आधीच निश्चित केला जातो. त्यासाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था केली जाते. या सर्व बाबीही या व्हिडिओमध्ये कुठेही दिसून येत नाहीत. पत्र सुचना कार्यालयाच्या संकेतस्थळावरही आम्ही याबाबत काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांनी 2015 मध्ये भेट दिल्याचे दिसून येते. युगांडाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष योहरी मुसेवेनी यांनी जुन 2019 मध्ये चीनला भेट दिली होती. त्याचे छायाचित्र खाली देत असून त्यांची वेशभूषा ही सर्वसामान्य असल्याचे आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
या व्हिडिओतील व्यक्ती युगांडाचे राजा असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात युगांडात लोकशाही आहे. व्हिडिओतील व्यक्तीची वेशभूषा ही घानातील पारंपारिक वेशभूषेशी मिळतीजुळती आहे. ही व्यक्ती युगांडाचा राजा नसल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.
Title:फॅक्ट चेक : या व्हिडिओतील व्यक्ती युगांडाचा राजा आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False


