
ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. एका तरुणाने यावेळी आठ गोळ्यादेखील झाडल्या. दिल्ली पोलिसांनी या तरुणास अटक केली असून, त्याच्या नावावरून सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत.
मीडियातील बातम्यांनुसार गोळी चालविणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद शाहरुख आहे. परंतु, काही व्हायरल पोस्टमध्ये या तरुणाचे नाव रोहित राजपूत असल्याचे सांगत तो भाजपचे नेते कपिल मिश्रा यांचा समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याप्रकरणी पडताळणी करीत सत्य समोर आणले आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
‘बुमलाईव्ह’ या फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला आहे की, “काल ज्याला मुसलमान नाव शाहरुख म्हणून दाखवत होते तो आहे रोहित राजपूत…कपिल मिश्रा या भाजपा नेत्याचा पंटर.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सोशल मीडियावर सध्या दोन फोटो व्हायरल होत आहेत. एक म्हणजे हातात बंदुक धरलेला तरुण (फोटो क्र. 1) आणि दुसरा कपिल मिश्रा भाषण देत असताना त्यांच्या मागे उभे असलेल्या व्यक्ती (फोटो क्र. 2). दोन्ही फोटोंवरून चुकीचा दावा केला जात आहे की, दिल्लीत गोळी चालविणारा दुसरा तिसरा कोणी नसून, कपिल मिश्राचाच साथीदार आहे,

या दाव्याची बुमलाईव्हने तथ्य पडताळणी केली होती. त्या फॅक्ट चेकची लिंक ट्विट केली. त्यानुसार, दिल्लीत गोळीबार केलेला व्यक्ती कपिल मिश्राचा समर्थक नाही. हातात बंदुक धरलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद शाहरुख आहे तर, कपिल मिश्राच्या मागे उभे असलेल्या व्यक्तीचे नाव रोहित राजपुत आहे. हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत. असे त्यांच्या पडताळणीतून समोर आले.
कपिल मिश्रा यांनी मौजपुर चौकात केलेल्या भाषणात शाहीन बागेतील आंदोलकांना तीन दिवसांत उठवून रस्ते मोकळे नाही केले तर आम्हाल रस्त्यावर उतरावे लागेल आणि आम्ही पोलिसांचेसुद्धा ऐकणार नाही, असा इशारा दिल्ली पोलिसांना दिला होता. यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या व्यक्तीचा फोटो दिल्ली हिंसाचारात गोळी चालविणारा म्हणून व्हायरल होऊ लगाला.
‘बुम’ने कपिल मिश्रा यांच्या संपर्क साधला असता त्यांनी हा व्यक्ती रोहित राजपूत असल्याचे सांगितले. तो मौजपूर येथील रहिवासी आहे. त्याने गोळीबार चालविणाऱ्याला शोधण्याचे फेसबुकवर आवाहनदेखील केले होते.

गोळी कोणी चालविली?
मीडिया रिपोर्टनुसार, मौजपूर भागात बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो पोलिसांसमोर गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, न जुमनता त्यांने आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
निष्कर्ष

दिल्ली येथे सोमवारी आठ गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद शाहरुख आहे. त्याचे नाव रोहित राजपूत असल्याचा खोटा मेसेज व्हायरल केला जात आहे. ‘बुमलाईव्ह’ने केलेल्या फॅक्टचेकचा उलटा अर्थ काढून फेक न्यूज पसरविली जात आहे.

Title:FAKE NEWS: दिल्लीत गोळीबार करणाऱ्याचे नाव रोहित राजपूत नाही. तसा खोटा मेसेज व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
