पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका आणि इजिप्त दौरा पूर्ण करून भारतात परतले असून या दौऱ्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशाच एख व्हिडिओमध्ये व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील मुस्लिम व इतर अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले असा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अमेरिकन पत्रकार विचारते की, “भारतात लोकशाही आहे. परंतु, तेथे काही मानवी हक्कांसाठी काम करणारे गट म्हणतात की, केंद्र सरकार व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली करत आहे. अल्पसंख्यकांचा विचार करत नाही. आपण येथे व्हाईट हाऊसमध्ये उभे आहात ज्या ठिकाणी अनेक जागतिक नेत्यांनी लोकशाहीचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना व्यक्तीस्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण व आपले सरकार काय करीत आहे?”

प्रश्नानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कानातून यंत्र काढताना दिसतात.

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोदींना जे प्रश्न भारतीय पत्रकारांनी विचारायला हवे होते ते अमेरिकन पत्रकाराने विचारले आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, द ट्रिब्यून या युट्यूब चॅनलने 22 जून 2023 रोजी व्हाईट हाऊसमधील या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले होते.

https://www.youtube.com/live/WlnROV64NIE?feature=share&t=1229

वरील व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना उत्तर देण्यासाठी कुठे ही टाळाटाळ केली नाही.

हिंदुस्थान टाइम्यच्या बातमीनुसार व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत असताना एक महिला पत्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाही व मुस्लिम आणि अल्पसंख्यकांना भाषणस्वातंत्र्य मिळवून देण्याबाबत प्रश्न विचारला.

या प्रश्नावर नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देतात की, “मला आश्‍चर्य वाटते की लोक म्हणतात असे तुम्ही म्हणत आहात. लोक म्हणतात नाही – भारतात लोकशाही आहे, जसे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की लोकशाही भारत आणि अमेरिका या दोघांच्या डीएनएमध्ये आहे. लोकशाही हाच आपला पाया आहे. आपण लोकशाही जगतो.”

पुढे संविधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, "आमच्या पूर्वजांनी संविधानाच्या रूपात लोकशाहीला शब्दात मांडले आहे. आमचे सरकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आधारित संविधानाच्या आधारे चालते. आमचे संविधान आमचे सरकार आहे आणि आम्ही हे सिद्धदेखील केले आहे. जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो तेव्हा जर मानवी मूल्य नसेल, माणुसकी नसेल, मानवी हक्क नसेल तर मग ती लोकशाही नसते. म्हणून जेव्हा तुम्ही लोकशाही स्वीकारता व ती जगतात तेव्हा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही."

“भारतात आम्ही ‘सबका साथ, सबका विकास, सबरा विश्वास, सबका प्रयास’ या मूलभूत तत्त्वांसह चालतो. भारतात प्रत्येकाला फायदा मिळतो. भारताच्या लोकशाही मूल्यांमध्ये कोणताही भेदभाव नाही, ना धर्माच्या आधारावर, ना जातीच्या आधारावर, ना वयाच्या आधारावर, ना भूभागाच्या आधारावर.”

सदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

https://youtu.be/1WNk6wAvwXk

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये पत्रकाराने लोकशाही स्वतंत्रता संबंधित प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली नव्हती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकाराला उत्तर देणे टाळले नव्हते; अर्धवट क्लिप व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered