जमिनीवर पडून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा तो व्हिडिओ रवीश कुमार यांचा नाही; वाचा सत्य

False सामाजिक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या वार्तांकनानंतर टीव्ही पत्रकारितेवर बरीच टीका होत आहे. पत्रकारितेच्या मापदंडाची पायमल्ली करून टीआरपीच्या खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काही जण जुन्या क्लिप्स शेयर करून म्हणत आहेत की, जुन्या पत्रकारांनीसुद्धा हेच केले आहे.

एक पत्रकार जमिनीवर लोळत, घसरत रिपोर्टिंग करत असल्याचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, ते पत्रकार रवीश कुमार आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य सिद्ध झाला. तो व्हिडिओ रवीश कुमार यांचा नाही.

काय आहे दावा?

जमिनीवर पडून पत्रकारिता करत असल्याचा एक विनोदी व्हिडिओ शेयर करून म्हटले की, “नागिण डान्स आणि पत्रकारितेचा लिथल कॉम्बो दाखविताना रविश कुमार.”

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडिओ आढळला. 2006 साली एनडीटीव्हीच्या अँकर्स आणि पत्ररकारांच्या कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागे झालेल्या चुका (ब्लूपर्स) यांचे संकलन या व्हिडिओमध्ये आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच जमिनीवर धडपडत रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराची क्लिप आहे. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण ती पाहू शकता.

हा धागा पकडून की-वर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून एनडीटीव्ही वेबसाईटवर 21 मे 2006 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, श्रीनगर येथे त्या दिवशी काँग्रेसच्या रॅलीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन सुरक्षारक्षकांसह सात नागरिकांचा मृत्यू आणि दोन दहशतवादी ठार झाले होते.

चालू गोळीबारामध्ये एनडीटीव्हीच्या पत्रकाराने या घटनेची प्रत्यक्ष वृत्तांत दिला होता. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये 2:00 मिनिटापासून अँकरला म्हणतो की, घटनास्थळी एनडीटीव्हीचे रिपोर्टर फैयाज बुखारी आणि कॅमेरामन शेख तारेख उपस्थित होते.

विविध माध्यमांनी या हल्ल्याविषयी बातम्या दिल्या होत्या. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नियोजित काश्मीर भेटीपूर्वी तीन दिवसांआधीच हा हल्ला झाला होता. 

या घटनेचा अधिक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ असोसिएट प्रेस अर्काइव्हच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. 

या व्हिडिओमध्ये 1:35 मिनिटांपासून पाहू शकता की, गोळीबार सुरू असताना पत्रकार रस्त्यावर पडून स्वतःचा बचाव करीत होते.

कोण आहेत फैयाज बुखारी?

फैयाज बुखारी श्रीनगर येथील पत्रकार आहेत. अनेक वर्षे एनडीटीव्ही वृत्तवाहिनीसोबत काम केल्यानंतर ते सध्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काश्मीरचे वार्तांकन करतात. 

2006 साली रॅलीवर भर दिवसा हल्ल्या झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. सुरक्षा बल अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना वाचविण्याबरोबरच दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुखारी अशा जीवघेण्या परिस्थितीमध्येदेखील प्रसंगावधान राखत जमिनीवर पडून लाईव्ह रिपोर्टिंग करीत राहिले.  

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रवीश कुमार नाहीत. जमिनीवर पडून रिपोर्टिंग करणारे ते पत्रकार फयाज बुखारी आहेत. 2006 साली दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये रॅलीवर गोळीबार केल्यामुळे बुखारी असे जमिनीवर पडले होते. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:जमिनीवर पडून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा तो व्हिडिओ रवीश कुमार यांचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False