VIDEO: जाणून घ्या बहिणीच्या बलात्काऱ्याचे मुंडके कापून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणाऱ्या व्हिडियोचे सत्य

False राष्ट्रीय सामाजिक

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडियो झपाट्याने पसरत आहे. यामध्ये एक व्यक्ती धडा वेगळे केलेले शीर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना दिसते. भर रस्त्यात असे कापलेले मुंडके घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीविषयी दावा केला जात आहे की, त्याने बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे असे हाल केले. बलात्काऱ्यांना चेतावणी म्हणून सदरील व्हिडियो जास्तीत जास्त शेयर करण्याचे आवाहन समाजमाध्यमावर केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या एका सुजाण वाचकाने सदरील व्हिडियो पाठवून (व्हॉट्सअ‍ॅप क्र. 9049043487) त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ व्हिडियो आणि पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह़

काय आहे पोस्टमध्ये?

व्हिडियोमध्ये एक व्यक्ती हातात कापलेले मुंडके घेऊन पोलीस स्टेशनमध्ये चालत येतो. तेथे पोलीस त्याला विविध प्रश्न विचारतात. हा व्यक्ती अत्यंत शांतपणे त्याची उत्तरे देतो.

विविध फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये लिहिले आहे की, चेन्नई में बहन के साथ बलात्कार हुआ तो भाई ने बलात्कार करने वाले आरोपी का सर काट कर पुलिस स्टेशन ले गया, देखे इस video को सभी ग्रुपो में फैला दो ताकि इस तरह की सोच रखने वाले लोग इस तरह का कार्य करने से पहले 100 बार सोचे कि ऐसा भी अंजाम हो सकता है.

फेसबुकवरदेखील हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यास पोलीस ठाण्याचे नाव दिसते. मलावल्ली टाऊन पोलीस स्टेशन (मंड्या) असे या ठाण्याचे नाव आहे. गुगलवर त्याचा शोध घेतला असता हे ठाणे कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील असल्याचे कळाले. बंगळुरूपासून सुमारे 100 किमी अंतरावर हा जिल्हा आहे. मग जर हे गाव कर्नाटकमधील आहे तर, हा व्हिडियो चेन्नईतील व्यक्तीचा कसा? असा प्रश्न निर्माण होतो. या व्हिडियोतील व्यक्ती कापलेले मुंडके घेऊन का फिरत आहे याचा शोध घेतला.

मलवल्ली ठाण्यात कापलेले मुंडके घेऊन आल्याच्या घटनेविषयी शोधले असता डेक्कन क्रोनिकल वृत्तपत्राची एक बातमी मिळाली. त्यानुसार, ही घटना सप्टेंबर, 2018 महिन्यातील आहे. पशुपती नावाच्या एका व्यक्तीने त्याचा मित्र गिरीशचा खून करून तो त्याचे मुंडके पोलीस ठाण्यात घेऊन आला होता. पशुपतीच्या आईविषयी गिरीशने अपशब्द काढल्याने त्यांच्यामध्ये वाद होऊन हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

मूळ बातमी येथे वाचा – डेक्कन क्रोनिकलअर्काइव्ह

न्यूज-18 हिंदी वेबसाईटनुसार, घटनेच्या तीन दिवस आधी पशुपतीच्या आईविषयी गिरीशने अपशब्द काढले होते. याचा पशुपतीच्या डोक्यात राग होता. संधी साधून त्याने गिरीशचा खून केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर, त्याने गिरीशचे शीर धडापासून वेगळे केले आणि ते गावाभर घेऊन फिरला. नंतर तो पोलीस ठाण्यात आला. मंड्या येथील पोलीस अधीक्षक शिवप्रसाद देवराजू यांनी माहिती दिली की, आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली होती. 

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज-18 हिंदीअर्काइव्ह

ई-टीव्ही भारत नॅशनल या वृत्तवाहिनीने हा व्हिडियो दाखवला होता. यामध्येसुद्धा म्हटले की हा व्हिडियो, मंड्या जिल्ह्यातील असून, दोन मित्रांच्या भांडणातून ही घटना घडली होती. व्हिडियोत मुंडके घेऊन फिरताना जो दिसतोय त्याचे नाव पशुपती आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आईचा अपमान करणाऱ्या गिरीशला अद्दल घडविण्यासाठी पशुपतीने त्याला माफ केल्याचा बनाव करून घरी बोलविले होते. घरी कॉफी पिऊन तो त्याला घेऊन शेजारच्या गावाकडे गेला. रस्त्यात एका सुनसान ठिकाणी गाडी थांबवून पशुपतीने गिरीशला आईच्या अपमानाविषययी जाब विचारला. यातून झालेल्या भांडणात त्याने गिरीशचा खून केला आणि शीर कापले.

यासारखे इतर व्हिडियो येथे पाहा – न्यूज-18 कन्नडटाईम्स ऑफ इंडियाटीव्ही-9 कन्नड

निष्कर्ष

वरील पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, सदरील व्हिडियो चेन्नईचा नाही. तो कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील आहे. तसेच व्हिडियोत दिसणाऱ्या व्यक्तीने बहिणीच्या बलात्काऱ्याचे मुंडके कापलेले नाही. मित्राने आईचा अपमान केला म्हणून पशुपती नावाच्या या व्यक्तीने 2018 मध्ये त्याचा खून करून मुंडके मलवल्ली पोलीस ठाण्यात घेऊन आला होता. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:VIDEO: जाणून घ्या बहिणीच्या बलात्काऱ्याचे मुंडके कापून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणाऱ्या व्हिडियोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False