एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, रशिया आणि कॅनडा दरम्यान एका जागेवर चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येतो की, तो जमिनीवर आदळतो की काय असा भास होतो. एवढेच नाही तर तो, चंद्र आकाराने एवढा मोठा दिसतो की, काही सेकंदांसाठी संपूर्ण सूर्य झाकोळून टाकतो.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी अंती कळाले की, हा व्हिडिओ खरा नाही. तो कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आलेला डिजिटल व्हिडिओ आहे.

तथ्य पडताळणी

36 सेकंदांच्या क्लिपमध्ये दिसते की, नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकाराचा चंद्र क्षितीजावरून वर येतो. इतका मोठा की, सूर्य झाकोळून काही क्षणांसाठी अंधार पडतो. आणि मग लगेच तो चंद्र मावळतो.

सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “जायंट मून रशिया ते कॅनडाच्या मध्ये उत्तर ध्रुवावर आर्टिक जवळ पुथ्वीची परिक्रमा करताना चंद्र पृथ्वीच्या कर्म इतका जवळ येतो की असा भास होतो की तो पृथ्वीवर आदळणार कि काय ? ही परिक्रमा तो ३० सेकंदात पूर्ण करतो व त्यातही तो ५ सेकंद तो सुर्यालाही झाकून टाकतो व लगचेच अदृश होतो. निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक विलोभनीय दृश्य एकदा पाहून विश्वासच बसत नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

विविध कीवर्ड्सचा आधार घेऊन शोध घेतल्यावर कळाले की, मूळ व्हिडिओ “Aleksey” नावाच्या एका व्यक्तीने टिकटॉकवर अपलोड केला होता. टिकटॉक भारतात बॅन असल्यामुळे आम्ही परदेशातील सहकाऱ्याच्या मदतीने मूळ व्हिडिओची तपासणी केली.

Aleksey हा एक डिजिटल आर्ट क्रिएटर आहे. म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून तो असे अ‍ॅनिमेशन व्हिडिओ तयार करतो. त्याच्या अकाउंटवर असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. सदरील चंद्राचा व्हिडिओ त्याने 17 मे 2021 रोजी अपलोड केला होता.

Aleksey च्या टिकटॉक व्हिडिओचा स्क्रीनशॉट

Aleksey चे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील आहे. त्यात त्याने स्पष्ट लिहिले आहे की, कॉम्प्युटर ग्राफिक्स आर्टिस्ट आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने त्याला मेसेज करून चंद्राच्या व्हिडिओबाबत विचारण केली. त्याने स्पष्ट सांगितले की, हा व्हिडिओ खऱ्या चंद्राचा नाही.

“मी युक्रेनमधील कॉम्प्युटर ग्राफिक आर्टिस्ट आहे आहे. व्हायरल होत असलेला चंद्राचा व्हिडिओ मी डिजिटल पद्धतीने तयार केलेला आहे. तो आर्क्टिक भाग किंवा उत्तर ध्रुवावरून दिसणाऱ्या चंद्राचा नाही,” असे Aleksey ने सांगितले.

Aleksey च्या इन्स्टाग्राम प्रोफाईलचा स्क्रीनशॉट

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, चंद्राचा हा व्हिडिओ खरा नाही. एका डिजिटल आर्टिस्टने तयार केलेला अ‍ॅनिमेशन व्हिडिओ आहे. उत्तर ध्रुवावरून एवढा मोठा चंद्र दिसत नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:विशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False