
अमेरिकेमध्ये डॉ. अब्दुल नामक व्यक्तीला पहिला मुस्लिम गव्हर्नर होण्याचा मान मिळाला, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. अमेरिकेच्या एका राज्याच्या गव्हर्नरपदी जनतेने प्रथमच मुस्लिम उमेदवाराला निवडूण दिले आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच भारतीय राजकारणावर टीका करताना लिहिले की, अमेरिकेतील जनता धर्म नाही तर, व्यक्तीची गुणवत्ता आणि पात्रता पाहून आपला नेता निवडते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सदरील पोस्टमध्ये डॉ. अब्दुल अमेरिकेतील कोणत्या राज्याचे गव्हर्नर म्हणून निवडूण आले हे दिलेले नाही. गुगलवर शोध घेतला असता कळाले की, त्यांचे संपूर्ण नाव डॉ. अब्दुल रेहमान ईल-सईद असे आहे. त्यांचे आईवडिल इजिप्तहून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. डॉ. अब्दुल साथीच्या रोगांचा अभ्यासक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 2018 साली मिशिगन राज्याची गव्हर्नरपदाची निवडणूक लढविली होती.
त्यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये मिशिगन गव्हर्नरपदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून राजकारणात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढल्यानंतर जगभरातील मीडियाने घेतलेल्या त्यांच्या मुलाखती, बातम्यांमधून ते अमेरिकेतील पहिले मुस्लिम गव्हर्नर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. म्हणजे, जर डॉ. अब्दुल निवडणूक जिंकले तर, ते पहिल मुस्लिम गव्हर्नर होतील असा त्याचा अर्थ होतो.

मूळ बातमी येथे वाचा – ख्रिश्चन सायन्स मॉनिटर । अर्काइव्ह
मग ते निवडणूक जिंकले का?
मिशगन गव्हर्नर पदासाठी डॉ. अब्दुल डेमोक्रॅटिक पक्षातर्फे लढत होते. पक्षातर्फे मानांकन मिळवण्यासाठी प्रायमरी निवडणूक 7 ऑगस्ट रोजी पार पडली आणि लगेच निकालसुद्धा लागला. न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टनुसार, डॉ. अब्दुल यांना 3.4 लाख मते मिळाली. परंतु, त्यांचा ग्रेचेन व्हिटमर यांच्याकडून पराभव झाला. ग्रेचेन यांना 5.86 लाख मते मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या रेसमध्ये डॉ. अब्दुल दुसऱ्या स्थानावर राहिले.

मूळ निकाल येथे पाहा – न्यूयॉर्क टाईम्स । वॉशिंग्टन पोस्ट
याचा अर्थ की, गव्हर्नरपदाच्या मुख्य निवडणुकीला डॉ. अब्दुल उभे नव्हते. ते गव्हर्नरपदाच्या स्पर्धेत होते. परंतु, प्रायमरी निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ग्रेचेन यांनी मिशिगन गव्हर्नर म्हणून निवडणूक जिंकली. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे बिल शुएट्टे यांना पराभूत केले. ग्रेचेने यांना सुमारे 22 लाख मते मिळाली होती. त्याच सध्या मिशिगन स्टेटच्या गव्हर्नर आहेत. खाली या निडणुकीत कोणाला किती मतदान झाले होते हे दाखवलेले आहे.

मूळ निकाल येथे पाहा – मिशिगन निवडणूक निकाल
डॉ. अब्दुल यांच्या वैयक्तिक वेबसाईटवरील माहितीनुसार, त्यांनी सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ पाणी, कर्जमुक्त उच्चशिक्षण, शंभर टक्के आपारंपरिक ऊर्जा निर्मिती आदी मुद्द्यांवर ही निवडणूक लढविली होती. त्यांना सेनेटर बर्नी सँडर्स, काँग्रेसवुमन अलेक्झांड्रिया ओकॅसिओ-कोर्टेझ, द नेशन, आणि करंट अफेयर्स आदींचा जाहीर पाठिंबा होता. त्यांना 3.4 लाख जरी मते मिळाली असली ते डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

मूळ बेवसाईट येथे पाहा – डॉ. अब्दुल वेबसाईट
प्रायमरी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. अब्दुल यांनी ट्विट करून विजेत्याचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहिले की, आज आमचा विजय जरी झाला नसला तरी, आमचे कार्य सुरू राहणार. ग्रेचेन व्हिटमर यांना विजयाच्या शुभेच्छा. उद्यापासून न्याय, समानता आणि स्थिरतेच्या दिशेने काम सुरूच राहणार. त्यांचे ट्विट खाली वाचू शकता.
निष्कर्ष
अमेरिकेमध्ये अद्याप मुस्लिम गव्हर्नर झालेला नाही. डॉ. अब्दुल ईल-सईद हे मिशिगन गव्हर्नरपदाचे उमेदवार होते. त्यांचा डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये पराभव झाला होता. सध्या ग्रेचेन व्हिटमर मिशिगनच्या गव्हर्नर आहेत. म्हणून ही पोस्ट असत्य आहेत.

Title:FACT CHECK: डॉ. अब्दुल अमेरिकेतील पहिले मुस्लिम गव्हर्नर आहेत का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
