
प्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांच्या नावे एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. “कोरोना विषाणूसंदर्भात कोणतीही चाचणी तातडीने करुन घेऊ नका. तर तशी लक्षणे आढळल्यानंतर नवव्या दिवशी चाचणी करा,” असे या ऑडिओ संदेशात म्हटले आहे. डॉ. देवी शेट्टी यांनी खरंच असे म्हटले का याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.
काय पोस्टमध्ये?
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । Archive
तथ्य पडताळणी
डॉ. देवी शेट्टी हे नारायणा हेल्थ या प्रसिद्ध हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. या हॉस्पिटलच्या ट्विटर अकाउंटवर भेट दिली असता लोकांनी या ऑडियो क्लिपबाबात विचारणा केल्याचे आढळले. त्याला उत्तर देताना नारायणा हेल्थ हॉस्पिटलने सांगितले की, “ही ऑडियो क्लिप डॉ. देवी शेट्टी यांची नाही. त्यांच्या नावे ती चुकीच्या दाव्यासह फिरवली जात आहे.” आऊटलूक इंडियाने सुद्धा ही ऑडियो क्लिप डॉ. शेट्टी यांची नसल्याचे म्हटले आहे.
मग ही ऑडियो क्लिप आहे तरी कोणाची?
ऑडियो क्लिपच्या इमेजवर daijiworld असे लिहिलेले आहे. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, हा ऑडियो संदेश डॉ. संतोष जेकब यांचा आहे.
daijiworld.com या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. संतोष जेकब चेन्नई येथील बी वेल रुग्णालयात अस्थीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा संदेश डॉक्टरांच्या एका समुहासाठी होता. भारतात कोरोना विषाणूच्या परीक्षणाकरिता असणाऱ्या टेस्ट कीटची कमतरता असल्याने त्यांनी याबाबत केलेले हे मार्गदर्शन आहे.
विजय कर्नाटका (Archive) या दैनिकाच्या संकेतस्थळाशी बोलताना डॉ. जेकब यांनी हा संदेश आणि आवाज आपलाच असल्याचे सांगितले.
डॉ. शेट्टी यांचा आवाजा या क्लिपमधील आवाजापेक्षा एकदम वेगळा आहे. नुकतेच एनडीटीव्ही वाहिनीसोबत बोलताना त्यांनी कोरोना प्रादुर्भाविषयी माहिती दिली होती.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, कोरोना विषाणू व्हायरल होत असलेली ही ऑडियो क्लिप डॉ. देवी शेट्टी यांची नाही. तो संदेश चेन्नईतील डॉ. संतोष जेकब यांचा आहे. भारतात टेस्टिंग कीटची कमतरता पाहता त्यांनी असे विधान केले होते.

Title:डॉ. देवी शेट्टी यांनी कोरोनाची चाचणी तातडीने करू नका असा सल्ला दिला का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
