
उत्तर प्रदेशमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) विरोध करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान असो किंवा पोलिसांचे दडपशाहीचे धोरण, दोन्हींविरोधात देशभर आवाज उठवला जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात मौलाना सैयद रज़ा हुसैनी नामक व्यक्तीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, आंदोलनात दगड मारत असल्यामुळे पोलासांनी त्यांना अशी मारहाण करून जखमी केले.
काय पोस्टमध्ये?
फेसबुक पोस्टमध्ये दोन फोटो शेयर केलेले आहेत. पहिल्या फोटोत एक ज्येष्ठ व्यक्ती हातात दगड घेऊन मारण्याच्या तयारीत दिसते. दुसऱ्या फोटोत तशीच दाढी असणारी व्यक्ती जखमी अवस्थेत बसलेली आहे. पोस्टकर्त्याने दोन्ही फोटो मौलाना सैयद रज़ा हुसैन यांचे असल्याचे सुचवत लिहिले की, 82 वर्षीय मौलाना सैयद रज़ा हुसैन दगड मारत होता, त्यानंतर पोलिसांनी नीट समजून सांगितले त्यामुळे विश्रांती घेत आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हात मोडलेला व पायावर जखमा असणारा व्यक्ती उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील प्रथितयश प्रा. मौलाना असद रजा हुसैनी आहेत. टेलिग्राफसह विविध वृत्तस्थळांवरील बातम्यांनुसार, मौलाना रजा (66) मुजफ्फरनगर येथील सादत मदरशात शिक्षक व अनाथाश्रमाचे व्यवस्थापक आहेत. येथे सुमारे 100 अनाथ मुले राहतात.
CAA आंदोलनादरम्यान हिंसाचार सुरू झाल्यानंतर 20 डिसेंबर रोजी पोलिस सादत मदरशामध्ये घुसले आणि त्यांनी मौलाना रजा यांच्यासह तेथील मुलांना मारहाण केली व नंतर ताब्यात घेतले. मौलाना रजा उत्तर प्रदेशमधील एक परिचित व प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे समाजातून दबाव आल्यानंतर 21 डिसेंबर रोजी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. जखमी अवस्थेतील त्यांचा फोटो सोशल मीडियावर फिरू लागला.

मूळ बातमी येथे वाचा – टेलिग्राफ इंडिया । कॅरावॅन डेली
विशेष म्हणजे मौलाना रजा यांना अरेबिक भाषेतील मौल्यवान योगदानासाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2016 सालच्या President’s Certificate of Honour साठी त्यांची अरेबिक भाषेकरिता निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे 4 एप्रिल 2019 रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील त्यांची भेट घेतली होती. नायडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचा मौलाना रजा यांचा फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

सविस्तर येथे वाचा – PIB । असल बात
मग दगड मारणाऱ्या व्यक्ती मौलाना रजा आहेत का?
हातात दगड घेऊन मारत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या फोटो खाली दिलेल्या माहितीनुसार हा फोटो कानपूर येथील आहे. तसेच हे वृत्तपत्राचे कात्रण आहे. याबाबत शोध घेतल्यावर कळाले की, हा फोटो हिंदुस्थान टाईम्सच्या उत्तर प्रदेश आवृत्तीमध्ये 22 डिसेंबर 2019 रोजी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला होता. हिंदुस्थान टाईम्सच्या ई-पेपरवर ही आवृत्ती उपलब्ध आहे. त्यातील या फोटोचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

मूळ वृत्त येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स (PDF) । हिंदुस्थान टाईम्स
या बातमीनुसार, कानपूर शहराच्या तलाक महल व यतिमखाना भागात 21 डिसेंबर रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी दगडफेकीसह पेट्रोल बॉम्ब फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दिवशी एक पोलिस कर्मचाऱ्यासह 13 आंदोलक गोळी लागल्यामुळे जखमी झाले होते. वृत्तपत्राचे कानपूर येथील छायाचित्रकार मनोज यादव यांनी दगडफेकीचा हा फोटो काढला होता. फोटोतील व्यक्ती कोण आहे याची माहिती बातमीत दिलेली नाही. परंतु, हा फोटो कानपूर मधील असल्याचे स्पष्ट होते.
निष्कर्ष
वरील पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले दोन्ही फोटो वेगवेगळ्या व्यक्तीचे आणि दोन वेगळ्या शहरातील आहेत. मौलाना असद रजा हुसैनी हे मुजफ्फरनगर येथे राहतात तर, दगड फेकण्याच्या फोटोत दिसणारा व्यक्ती कानपूरमधील आहे. शिवाय मौलाना रजा यांनी आंदोलनात भागदेखील घेतला नव्हता. त्यामुळे ही पोस्ट चुकीची माहिती पसरवित आहे.

Title:कानपूरमध्ये दगड मारणारा हा व्यक्ती मुजफ्फरनगर येथील मौलाना रजा नाहीत. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
